पानोडी येथे बंद घराचे कुलूप तोडून दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या घरफोड्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या ७२ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणात चार आरोपींना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातून शिताफीने जेरबंद करण्यात आले असून, संगमनेर न्यायालयाने त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीतील अन्य तीन फरार साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
पानोडी (ता. संगमनेर) येथील रहिवासी नवनाथ पाबळ यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी दि. ८ ऑक्टोबरच्या रात्री घरात प्रवेश केला होता. चोरट्यांनी कपाटातील अडीच लाखांची रोख रक्कम व दोन लाखांचे सोन्याचे दागिने असा साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणी पाबळ यांच्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, गणेश धोत्रे, अशोक लिपणे, प्रताप देवकाते, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, सतीष भवर यांच्यासह पथकाने गोपनीय खबऱ्यांचे जाळे आणि सायबर सेलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास चक्र वेगवान केले.
तपासादरम्यान हा गुन्हा सायरब जैनु काळे व त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले. हे संशयित आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारात दबा धरून असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी रविवारी (दि. ११) परिसरात धाड टाकून चौघांना शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये सायरब जैनु काळे (जि. छ. संभाजीनगर), कलर सुरेश काळे, सोन्या सुरेश काळे आणि संदिप सुरेश काळे (जि. अहिल्यानगर) या चौघांचा समावेश आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी पानोडी येथील गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा अमरेश निजाम काळे, बाबु टबुक्या चव्हाण आणि घाऱ्या टबुक्या चव्हाण (जि. छ. संभाजीनगर) या तीन फरार साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड केले.
दरम्यान, ताब्यातील चारही आरोपींना पुढील तपासासाठी आश्वी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून न्यायालयाने चौघांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती आश्वीचे सहायक पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी दिली. तर, या कारवाईमुळे परिसरातील इतरही घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.