दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना

ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे मोबदला देण्याची मागणी

झरेकाठी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होण्याची शक्यता आहे. जनावरांची संख्या मोठी असताना त्यांच्या चाऱ्याची उपलब्धता कशी करायची, हा महत्त्वाचा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे ऊस प्लॉट चारा छावण्यांसाठी आरक्षित करून त्यातून उपलब्ध होणारा चारा स्थानिक शेतकऱ्यांच्या जनावरांना पुरवठा करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना डिग्रस येथील जागरूक शेतकरी गणेश श्रीराम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केली आहे.


दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन केले जात असताना, या छावण्यांमधील जनावरांसाठी आवश्यक असणारा चारा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करणे हे प्रशासनापुढील आव्हान आहे.


या समस्येवर उपाय सुचविताना गणेश श्रीराम यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने सार्वजनिक तलाव आणि धरणांमधील पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे नियोजन केले जाते, त्याच धर्तीवर दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध असलेल्या चाऱ्याचेही नियोजन करणे गरजेचे आहे. संगमनेर तालुक्यातील चारा बाहेरगावी जाण्याऐवजी तो स्थानिक पशुधनासाठी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे.

संगमनेर तालुक्यात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. ऊसतोडणीसाठी आलेल्या ऊस क्षेत्राचे नियोजन करून त्यातील उसाचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी करता येऊ शकतो. त्यासाठी संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचे ऊस प्लॉट चारा छावण्यांसाठी आरक्षित करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी सूचना गणेश श्रीराम यांनी केली आहे.

अशा प्रकारचे नियोजन केल्यास चारा छावण्यांसाठी आवश्यक असणारा चारा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच दुष्काळामुळे चाऱ्याअभावी अडचणीत येणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळू शकेल.

चारा उपलब्ध करून देताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचाही विचार करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या उसाचा उपयोग चारा छावण्यांसाठी केला जाणार असेल, तर त्यांना शासनाच्या नियमानुसार व रास्त आणि योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे पैसे अदा करण्याबाबत योग्य व्यवस्था करावी, अशी मागणीही गणेश श्रीराम यांनी केली आहे.


शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन ऊस उत्पादक शेतकरी आणि चारा छावणी व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधल्यास या उपाययोजनेला चांगला प्रतिसाद मिळू शकतो. योग्य मोबदला मिळाल्यास ऊस उत्पादक शेतकरीदेखील दुष्काळी परिस्थितीत शासनाला सहकार्य करण्यास पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुष्काळी परिस्थितीत जनावरांना जगविणे, पशुधनाचे संरक्षण करणे आणि पशुपालक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. चारा छावण्या सुरू करताना केवळ छावण्यांची संख्या निश्चित करून चालणार नाही, तर तेथे दाखल होणाऱ्या जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध होईल, याचेही नियोजन करावे लागणार आहे.चाऱ्याची उपलब्धता, त्याचे वितरण, वाहतूक आणि शेतकऱ्यांना दिला जाणारा मोबदला या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा चारा पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यास पशुधनाचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.
त्यामुळे संगमनेर तालुक्यातील ऊस क्षेत्राचा संभाव्य चारा स्रोत म्हणून विचार करून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला देत त्यांच्या सहकार्याने चारा छावण्यांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर शासन आणि प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी जागरूक शेतकरी गणेश श्रीराम यांनी केली आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *