{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

शेतकरी महिलेवर हल्ला; चेहऱ्यासह शरीरावर गंभीर जखमा

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, बुधवारी (दि. १४ ऑक्टोबर) सकाळी शेतात कामासाठी जात असलेल्या एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात आशा संतोष निठवे (वय ३०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या चेहऱ्यासह शरीरावर जखमा झाल्या असून, त्यांना तातडीने संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे डिग्रस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कांद्याच्या पिकात कामासाठी जात असताना हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास आशा निठवे या कांद्याच्या पिकातील रोपांची निंदणी करण्यासाठी शेताकडे जात होत्या. यावेळी कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यामुळे त्या घाबरल्या; मात्र त्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

वनविभागाकडून पिंजरा लावला

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून पंचनामा केला. बिबट्याला पकडण्यासाठी संबंधित परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे. मात्र, बिबट्याचा वाढता वावर आणि वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.

शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न

डिग्रस परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा दिवसा महिलेवर हल्ला झाल्याने शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकरी कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतीची कामे करण्यासाठी महिला व पुरुषांना दररोज शेतात जावे लागते, तर विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावी लागते. अशा परिस्थितीत बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी वनविभागाने केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात नियमित गस्त घालणे, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणे आणि हल्ले रोखण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरणेही कठीण होत असल्याची भावना सरपंच अशोक खेमनर यांच्यासह ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वनविभागाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

झुंझार न्यूज | आश्वी परिसरातील स्थानिक बातम्या

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *