नवरात्रोत्सवाचा उत्साह आणि आदिशक्तीचा जागर सुरू असतानाच, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक येथे गंभीर घटना घडली आहे. गावातील दांडियाचा* मंडप गाडी घालून पाडल्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून गावाच्या महिला सरपंच उज्वला देशमाने यांच्यासह अन्य चौघांवर हल्ला करण्यात आला. दगड, लोखंडी गज आणि लाकडी दांडक्यांनी झालेल्या या हल्ल्यात सरपंच देशमाने यांच्यासह तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १६) नवरात्रोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले चौकातील देवीची आरती आटोपून महिला सरपंच उज्वला देशमाने या रात्री ८:३० च्या सुमारास बाजारतळ परिसरात आल्या होत्या. दुपारी नवरात्रोत्सवासाठी उभारलेला दांडियाचा मंडप एका चारचाकी वाहनाने धडक देऊन पाडण्यात आला होता. या प्रकाराबाबत सरपंच देशमाने व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित संशयितांना जाब विचारला.
याचा राग आल्याने संशयितांनी अचानक हिंसक होत सरपंच उज्वला देशमाने, नवनाथ देशमाने, प्रशांत देशमाने व नवनाथ नाईकवाडी यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी लोखंडी गंज, लाकडी दांडके, धारदार हत्यारे आणि दगडांचा वापर करून जबर मारहाण करण्यात आली. तसेच गळ्यातील दीड तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणी नवनाथ देशमाने यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रशांत कोल्हे, प्रवीण कोल्हे, ऋषिकेश कोल्हे, कमलेश डेरे, ओंकार तोरकडी, प्रणित गोर्डे, दिलीप डेरे आणि इतर दोन अनोळखी इसम (सर्व रा. धांदरफळ बुद्रुक) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेला वेगळी बाजू असल्याचे सांगत प्रवीण कोल्हे यांनीही फिर्याद दिली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलो असता कोणतीही पूर्वकल्पना किंवा कारण नसताना गैरकायद्याची मंडळी जमवून चाकू, लाकडी दांडके आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करून गळ्यातील सोन्याची चेन व घड्याळ काढून घेतल्याचा आरोप कोल्हे यांनी केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नवनाथ देशमाने, नवनाथ नाईकवाडी, प्रशांत देशमाने, विशाल काळे, अजिंक्य क्षीरसागर व इतर दोन अनोळखी इसमांवरही तालुका पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, सणासुदीच्या काळात घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे धांदरफळ बुद्रुक गावात प्रचंड खळबळ उडाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचे उपाय योजले असून, घटनेची सखोल चौकशी केल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती समोर येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.