{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

अंधारामुळे रात्री शोधकार्यात अडथळा; आज सकाळपासून पोलीस, पाटबंधारे विभाग व रेस्क्यू टीमकडून शोध सुरू

 

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील सतीश आप्पासाहेब वाणी (वय ३५) यांनी शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चनेगाव येथील वसंत बंधाऱ्यावरून पाण्यात उडी मारल्याची घटना घडली. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभाग आणि रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चनेगाव येथील वसंत बंधाऱ्यावरून प्रवास करणाऱ्या काही ग्रामस्थांना एक व्यक्ती बंधाऱ्यावरून पाण्यात उडी मारताना दिसल्याची माहिती आहे. घटनास्थळी बंधाऱ्याच्या कडेला एक दुचाकी उभी असल्याचे, तसेच जवळच मोबाईल फोन पडलेला असल्याचे आढळून आले. दुचाकी व मोबाईल फोनच्या आधारे संबंधित व्यक्ती झरेकाठी येथील सतीश वाणी असल्याचे निष्पन्न झाले.

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तातडीने वाणी कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी आश्वी पोलीस स्टेशनसह राहुरी व लोणी पोलीस स्टेशनला घटनेची माहिती कळविली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोधकार्य सुरू करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ डोळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर मंत्री डॉ. विखे पाटील यांनी रेस्क्यू टीम, पाटबंधारे विभाग आणि पोलीस प्रशासनाला तातडीने शोधमोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी आहेर यांनी शनिवारी रात्री सुमारे आठ वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, रात्री अंधार पडल्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले.

आज सकाळपासून शोधमोहीम सुरू

रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच राहता रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली.

या घटनेमुळे झरेकाठी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सतीश वाणी यांचा शोध लागण्याकडे कुटुंबीयांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. शोधमोहीम सुरू असून, पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *