घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल
झरेकाठी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील वाडेकर वस्तीवर बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संतोष धोंडीभाऊ वाडेकर यांनी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, संतोष वाडेकर हे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १६ ऑक्टोबर रोजी रात्री कुटुंबीय जेवण करून झोपले होते. त्यानंतर मध्यरात्री सुमारे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी-कोंयंडा तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाट उचकटून त्यामधील रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर शेजारी राहणारे लहू बाजीराव डोलनर यांच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश केला. तेथून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून तोडून नेल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घरांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेऊन चोरीचा तपास करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.
असा ऐवज चोरीला गेल्याचा दावा
तक्रारदार संतोष वाडेकर यांच्या घरातून सुमारे १० हजार रुपये रोख, एक तोळा वजनाची सोन्याची मिनी गंठण आणि लहू बाजीराव डोलनर यांच्या घरातून त्यांच्या पत्नीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.