‘कोणतेही चांगले कार्य करताना अडचणी आणि त्रास ठरलेलाच असतो. मलाही या क्षेत्रात ३३–३४ वर्षे झाली; अनेक संकटे झेलली. मात्र, ज्या माणसाला त्रास होतो, तोच खऱ्या अर्थाने काम उभे करतो,’ अशा शब्दांत प्रसिद्ध प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी आश्वी खुर्द येथील मंदिर जीर्णोद्धाराच्या कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. ग्रामदैवत बालब्रह्मचारी शिवभक्त परमपूज्य पुंजाआई माता, प्रभू श्रीराम व प्रभू श्रीदत्त यांच्या संयुक्त मंदिराच्या भव्य कामाची पाहणी करत त्यांनी मंदिराच्या उभारणीचे भरभरून कौतुक केले. तसेच, ‘पुंजाआई महात्म्य’ ग्रंथातील अलौकिक अनुभव आणि पुंजाआई मातेचे कार्य समाजातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
एका खासगी कार्यक्रमानिमित्त आश्वी खुर्द येथे आले असताना इंदोरीकर महाराजांनी मंदिराला सदिच्छा भेट दिली. मंदिराचे बांधकाम, कोरीव वास्तुकला, परिसराची रचना आणि मूर्तींची व्यवस्था यांची माहिती घेत त्यांनी कामाचा आढावा जाणून घेतला. मंदिर उभारणीसाठी येणारा खर्च आणि कार्यकर्त्यांना कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अडचणींना न डगमगता श्रद्धा, जिद्द आणि एकजुटीने काम पुढे नेण्याचा संदेशही त्यांनी दिला.
‘पुंजाआई महात्म्य’ घराघरांत पोहोचवा!
पुंजाआई मातेच्या आध्यात्मिक कार्याविषयी बोलताना इंदोरीकर महाराज म्हणाले की, ‘पुंजाआई महात्म्य’ हा ग्रंथ आपण वाचला असून, त्यात अत्यंत महत्त्वाचे आणि अलौकिक अनुभव नोंदवलेले आहेत. मातेचे कार्य, त्यांचा आध्यात्मिक वारसा आणि त्यांच्याशी संबंधित प्रेरणादायी अनुभव समाजापर्यंत अधिक व्यापक स्वरूपात पोहोचणे आवश्यक आहे. हा अनमोल इतिहास केवळ ग्रंथापुरता मर्यादित न राहता घराघरांत पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुंजाआई माता या देवगडचे किसनगिरी महाराज यांच्या मानलेल्या गुरुभगिनी, तर भास्करगिरी महाराज यांच्या मानलेल्या आई होत्या. तसेच, ओझर येथे जगुमाई मंदिराची उभारणी केल्याचा ऐतिहासिक संदर्भही त्यांच्या कार्याची महती अधोरेखित करतो. या आध्यात्मिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने आश्वी खुर्द येथे साकारत असलेले संयुक्त मंदिर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
लोकवर्गणीतून भव्य मंदिराची उभारणी
सुमारे 40 बाय 30 फूट जागेवर साकारत असलेल्या या संयुक्त मंदिरासाठी अंदाजे 45 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. राज्याचे जलसंपदामंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या धार्मिक कार्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. उर्वरित कामासाठी लोकवर्गणी आणि दानशूर भाविकांच्या सहकार्यातून निधी उभारला जात आहे. शासकीय मदत आणि ग्रामस्थांच्या सामूहिक योगदानातून हे सुंदर मंदिर आकार घेत आहे. नांदेड येथील कुशल कारागिरांनी मंदिराचे चार कळस आणि सात खांबांवर आकर्षक कोरीव काम केले आहे. बालब्रह्मचारी शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज (बाबाजी) यांनी दिलेली पुंजाआई मातेची मूळ मूर्ती अत्यंत श्रद्धेने जतन करण्यात आली आहे. इतर मूर्तींची प्रतिष्ठापना दानशूर व्यक्ती आणि भाविकांच्या सहकार्यातून करण्यात येणार आहे.
‘एका बाजूला साक्षात पांडुरंगाचे मंदिर आणि त्याच्या समोर पुंजाआई मातेचे मंदिर, हा अत्यंत सुंदर आणि पवित्र योग जुळून आला आहे,’ अशा शब्दांत इंदोरीकर महाराजांनी समाधान व्यक्त केले.
मंदिराचे उर्वरित काम पूर्ण करून येत्या मार्च 2027 अखेर भास्करगिरी बाबांच्या उपस्थितीत तीन दिवसीय भव्य सोहळ्यात मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्याचे नियोजन मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. श्रद्धा, लोकसहभाग, दानशूरांचे योगदान आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांतून उभे राहत असलेले हे संयुक्त मंदिर आश्वी परिसराच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालणार आहे.
इंदोरीकर महाराजांच्या भेटीमुळे मंदिर उभारणीच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली आहे