कोपरगांव : झुंजार न्यूज
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगाला आर्थिकस्थैर्य प्राप्त होण्यासाठी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना निर्देश देवुन त्याबाबतचे धोरण आखून सुमारे दहा हजार कोटी रूपये आयकर माफ केला ही बाब स्वागतार्ह असून साखर धंद्याला आणखी बळकटी येण्यांसाठी केंद्र शासनाने साखर निर्यातीऐवजी इथेनॉल निर्मातीला जास्तीचे आर्थीक सहाय्य द्यावे जेणेकरून आपल्या देशात कच्च्या तेलाची आयात थांबवून परकीय चलनात मोठया प्रमाणांत बचत होईल अशी मागणी संजीवनी उद्योग समुहाने अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केली.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी संचालिका सौ. सोनिया व बाळासाहेब दत्तात्रय पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते विधीवत पुजेने झाली. त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेवुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमतेत आधुनिकीकरणासह संगणकीकरणाला प्राधान्य देत सुधारणा करून मार्गक्रमण सुरू ठेवले असून आर्थिक शिस्त व गतीमान प्रशासकीय कामकाज, प्रशासकीय शिस्त, विना अपघात कारखाना कामकाज, उस उत्पादक शेतक-यांसह कामगारांचे हित, सर्व संगणकीकरण कामकाज या पंचसुत्रीची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे ते म्हणाले.
उपाध्यक्ष रमेश घोडेराव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, एच आर मॅनेजर प्रदिप गुरव, सचिव विधिज्ञ तुळशीराम कानवडे आदींनी उपस्थितांचे स्वागत केले.

श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सभासद शेतक-यांचे प्रती एकरी उसासह सर्व पिकांचे उत्पादन वाढीसाठी धडक कृती कार्यक्रम हाती घेवुन कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ करून तंत्रशुध्द मार्गदर्शनाने उस लागवड करून उपग्रहाद्वारे उतारा, तोडणी कार्यक्रमासाठी संगणकीय थ्री डब्ल्यू डी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणारा देशातील एकमेव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना आहे. कार्यक्षेत्रातील सभासद शेतक-यांचे उसाचे उत्पादन वाढावे यासाठी कारखान्यांने प्रती एकरी उस व साखरेचे उत्पादन देणा-या उस जातींचे सुमारे सहा कोटी रूपयांचे उस बेणे सभासद शेतक-यांना निःशुल्क पुरविले आहे.
बिबटयासह हिंस्र प्राण्यांचा प्रार्दुभाव वाढल्याने शेतक-यांच्या सुरक्षीततेसाठी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने केंद्र व राज्य शासनाच्या सर्व परवानग्या घेवुन राज्यात सर्वप्रथम ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पीकावर किटकनाशक फवारणी कार्यक्रम माफक दरात शेतक-यांच्या बांधापर्यंत उपलब्ध करून दिला आहे. त्याचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा.

माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर साखर कारखानदारीच्या यशासाठी आधूनिकीकरणाची कास धरली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल सुरू आहे. केंद्र शासन यापुर्वी परकीय चलनासाठी साखर निर्यातीवर विविध अनुदाने देवुन त्याबाबतचे धोरण अवलंबवत होते, त्याचप्रमाणे कच्च्या तेलाच्या आयातीवरही भारत सरकारला मोठया प्रमाणांत आर्थिक झळ सोसावी लागते तेंव्हा ती थांबविण्यासाठी येथील साखर उद्योगामार्फत इथेनॉल निर्मीतीसाठी जास्तीचे आर्थीक सहाय्य केंद्र शासनाने देवुन त्याबाबतचे निश्चित धोरण घेण्यासाठी तातडीने पावले उचलावी, साखर निर्यात कमी करून साखर कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉल निर्मीतीसाठी प्राधान्य द्यावे. देशांतर्गत जेव्हढा साखरेचा खप आहे तेंव्हढीच साखर निर्मीती करावी असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमांस संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, ज्येष्ठ नेते कृषिरत्न दत्तात्रय कोल्हे, सर्व संचालक, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, मच्छिंद्र केकाण, सुनिल देवकर, अंबादास देवकर, बाजीराव मांजरे, संभाजीराव गावंड, अरूणराव येवले, शरद थोरात, दगुराव चौधरी, साहेबराव रोहोम, रिपाई नेते दिपकराव गायकवाड, जयराम गडाख, कामगार नेते मनोहर शिंदे, यांच्यासह विविध क्षेत्रातीलमान्यवर आजी माजी संचालक, उस उत्पादक सभासद शेतकरी, उसतोडणी वाहतुकदार, कंत्राटदार मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.
चौकट
कोल्हे कारखाना उस बेणे मळयात ६ हजार विकसीत जाती.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी पाण्यात दर्जेदार बेण्यांत उसाचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला तोच आदर्श ठेवून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या उस बेणे मळ्यात ६ हजार विकसीत उस जाती असुन त्याचा देश विदेशात प्रसार सुरू असल्याचे बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले
