संगमनेर : झुंजार न्यूज 

 

ज्या व्यक्तीमुळं हे जग पाहता आलं त्या व्यक्तीविषयी आपल्या भावना नेमक्या शब्दात पकडणं.. त्यांची अभिव्यक्ती करणं महाकठीण असतं. आयुष्यात आपण कितीही मोठं झालो तरी… थरथरत्या पावलांना आत्मविश्वास आणि चालण्याचं बळ देणारी आई विसरु म्हटलं तरी विसरता येत नाही हेच खरं… प्रत्येकाचं अवघं विश्व या दोन अक्षरी शब्दानं भरलेलं असतं….

 

पश्चिम महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आईला ‘ बाई ‘ म्हणण्याची पद्धत आहे. अहो या आदरार्थी संबोधनापेक्षाही ए आई… हा एकेरी शब्द खुप जवळचा वाटतो. आमच्या घरात आम्ही भावंड आईला बाई म्हणत असू. भला थोरला बारदाणा असलेल्या शेतकरी कुटूंबात दिवंगत तिर्थरुप भाऊसाहेब थोरात ( दादा ) या अवलिया व्यक्तिमत्वाची पत्नी म्हणून आमच्या बाईचा प्रवेश झाला. तालुक्यातलं जोर्वे हे आमचं गाव.. गावाचा इतिहास थेट प्रागैतेहासिक काळाला भिडणारा.. ताम्रपाषाण युगात अमृतवाहिनी प्रवरेच्या काठी मानवानं पहिल्यांदा वस्ती केली… भटक्या जीवनातून तो स्थिरावला.. चाकाचा, भाजक्या पक्क्या मातीच्या भांड्याबरोबरच तांबे या धातुचा उपयोग करु लागला. प्रवरेच्या वाहत्या पाण्यावर शेती करायला लागला. असं आमचं गाव थेट हजारो वर्षांचा वारसा सांगणारं. आमचं जुनं घर या प्रवरामाईच्या काठी असलेल्या शेतात हजार बाराशे फुटांवर होतं. स्वातंत्र्यापूर्वी 1946 सालात रात्रीच्या वेळी अचानक प्रवरेला आलेल्या पुरात ते घर वाहून गेलं. सगळीकडं पाणीच पाणी साचलं होतं त्या भयाण रात्री कुटूंबातील आजोबा, पणजी, आत्या, चुलते, आमचे दादा, बाई यांनी मिळेल ते किडूक मिडूक घेवून पाण्यातून वाट काढीत उंचवट्यावर आसरा घेतला. पुढं त्याच जागेवर भेंडे, माती, लाकडी मेढी, वाशांचा उपयोग करुन घर बांधलं. बाईनं ते पांढऱ्या मातीनं चांगलं लिपलं.. सारवलं. त्यानंतर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर दांडा पट्ट्यांची एक खोली काढली. तीचा वापर नंतरच्या काळात बैठकीची खोली म्हणून झाला. तिर्थरुप दादा स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. त्यातून साम्यवादी चळवळ, तुरुंगवास अशी परिक्रमा करीत त्यांचे चुलते दामोदर पाटील यांना सर्व जण नाना म्हणत यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार चळवळीत काम करू लागले होते. मला कळायला लागलं त्या वेळी आमच्या कुटूंबात सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणजे पणजी मंजुळाबाई, आजोबा संतुजीबाबा, दादा, बाई, मोहिनी, रोहिणी, शोभा व दुर्गा या चार बहिणी, चुलते पंडीततात्या, मधुकरनाना असा मोठा परिवार होता. दादा त्यांची कामं आणी समाजसेवा करताना शेती पाहत. त्यामुळं घराची सारी सूत्र आमच्या खमक्या स्वभावाच्या बाईच्या हाती आली होती.

शिस्तप्रिय असल्यानं तिचा स्वभाव तापट होता. स्वतः चुकायचं नाही आणी दुसऱ्यालाही चुकू द्यायचं नाही. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी व प्रत्येक वस्तू जागच्या जागेवर असण्यावर तिचा अतिकटाक्ष. त्यामुळं ती कधी शांत वाटलीच नाही.. सतत तीची चांगल्यासाठी तगमग सुरु असे. मात्र हे तिचं वरवरचं रुप होतं.. बाई मुळात फणसासारखी होती वरुन काटेरी अंतरंगात मात्र तितकीच प्रेमळ आणी फणसाच्या गऱ्यांसारखी गोड.. हवीहवीशी वाटणारी. प्रत्येकाचं हवं नको ते पाहताना त्यांची मनापासून काळजी घेणारी… आमच्या मोठ्या कुटूंबातल्या सगळ्यांच स्वयंपाकपाणी, घरातील स्वच्छता, झाडझुडीपासून सर्व व्यवस्था, आम्हा भावंडांना वेळेवर शाळेत पाठवणं, आजोबांची वेळच्या वेळी सर्व काळजी ती घ्यायचीच. जोडीला दादांचे सामाजिक कार्यातले सवंगडी, कार्यकर्ते, पाहुणे रावळे साऱ्यांची चहापाणी, जेवणखाण अशी उस्तवार ती करायची. पहाटेपासून सुरु झालेला तिचा दिनक्रम कधी संपायचा आणि ती कधी धरणीला पाठ टेकायची आम्हाला कधी कळलंच नाही. आम्ही कधीच निद्रादेवीच्या कुशीत गेलेलो असायचो. पहाटे आम्ही सर्व साखर झोपेत असताना, आम्ही उठण्यापूर्वीच ती जागी व्हायची, सर्व आन्हीकं आटोपून तीचं दैनंदिन काम सुरुही झालेलं असायचं. कृषीक्षेत्रातील विकासाच्या त्या कालखंडात दादाही त्यांचे हजारो व्याप सांभाळून शेतीच्या कामावर स्वतः देखरेख करायचे. नव्यानं विहीरी खोदल्या जात होत्या, जमिनी सपाट करुन शेती केली जात होती. पाणी उपसण्यासाठीच्या मोटा जावून ऑईल इंजिने आली होती. सिंचनासाठी पाईपलाईन करायला सुरवात झाली होती. या सगळ्या कामात दादा पुढं असायचे.. बाकी शेतकरी त्यांचं अनुकरण करायचे. या शिवाय सामाजिक कार्य, राजकारण, कुटुंब व्यवस्था, मुलांचं शिक्षण, लग्नकार्य यात ते झपाटून जावून काम करीत होते. या साऱ्या कामामागं बाईची खंबीर साथ होती हे मात्र खरं… ती कुठंच कमी पडली नाही. मदतीला घरात कोणी दुसरं बाई माणूस नसतानाही ती एकटी हे सर्व करीत होती. त्याकाळात शेतीवरचा सालकरी गडी त्याच्या जेवणखानासकट सांभाळावा लागे. मीराबाई, हिराबाई व ताराबाई या आत्या सासरी नांदत असताना दिवाळी व सुट्टीसाठी जोर्व्याला यायच्या. त्यांची रमेश, शैलजा, मंगल, अशोक, अनिल, दिलीप, विजया, अरुणा, ज्योत्स्ना ही मुलं आम्हा भावंडांची समवयस्क असल्यानं सुट्टीत आम्ही धमाल करीत असू. आंब्याच्या थंडगार आणि घनदाट सावलीत पत्त्यांचे डाव व इतर खेळ रंगत. दुपारच्या उन्हात प्रवरेत तासनतास डुंबत असू. या सगळ्यावर कडव्या शिस्तीचं सावटही असे. आमच्या प्रत्येक गोष्टीवर बाईचं बारीक लक्ष असे. आमचा सकाळपासून चहा, नाष्टा, जेवण सुरु असूनही ती कधी कंटाळली नाही हे विशेष.

जोर्वे गावातल्या अनेक गरीब कुटुंबांशी तिचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्याशी नित्य सुसंवाद होता. कोणाच्याही आजार पाजाराला ती धावून जात असे. दारात दबक्या पावलांनी आलेल्या स्त्रीची गरज ओळखून कोठीतल्या ज्वारी, बाजरीतलं अधुली पायली धान्य तिच्या पदरात टाके. वर घोटभर दुधाचा चहापण मिळायचा. घरात दूध दुभतं असल्यानं तांब्याभरुन ताकही तीला मिळे. तिनं कधीच कोणाला दारातून रिकाम्या हातानं पाठवलेलं मला तरी आठवत नाही. त्यामुळे तिच्या मदतीसाठी गावातल्या महिलाही कायम तयार असायच्या. 1962 सालानंतर दादांनी समाजकारणासह सक्रीय राजकारणात यशाची नवी शिखरं सर केली. जिल्हा बँकेचं उपाध्यक्ष व नंतर अध्यक्षपद मिळाल्यानं जिल्हा पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाली. अण्णासाहेब शिंदे यांच्या लोकसभेचे खासदार व केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाला. त्यांचे मेव्हणे म्हणून दादांनी मोठी जबाबदारी स्विकारल्यानं या राजकारणाचा परिणाम घरावरही झाला. पाहुणे व कार्यकर्त्यांचा सतत राबता असायचा. त्यामुळं घरातली कामं पाहून उसाचं गुऱ्हाळ व शेतीकडं पाहण्याची जबाबदारीही बाईवरच आली. मात्र पंडीतराव तात्या व मधुकरनाना तसेच सालदारांची कुटूंबे मदतीला आली हीच काय ती तिच्या दृष्टीनं जमेची बाजू. आता जुन्या घराला कौलारू पडवी काढली होती. त्यातच एक ऑफिसची खोली त्यात टेबलखुर्च्या आल्या होत्या. घरापुढं 12 बैलं आणी 10, 20 म्हशींची दावण होती. घरात दुध, दुभत्याची कमी नव्हती. घरात वीज आली, ट्रींग ट्रींग वाजणारा फोन आला. गोबर गॅसवर स्वयंपाक होवू लागला. शेणामातीची भुई गेली.. सिमेंटचा गिलावा आला. विजेवर चालणाऱ्या मोटारींमुळे तर अमुलाग्र क्रांती झाली. हिरवेगार उसाचे मळे दिमाखात डोलू लागले. याच काळात दादांनी साखर कारखान्याची उभारणी केली. हजार बाराशे टन ऊस कारखान्याला जाऊ लागल्यानं, नगदी पैसा हातात खेळू लागल्यानं समृध्दी आली. दादांनी दोन मजल्याचा बंगला बांधला, त्यात पहिल्यांदा दूरदर्शन संच बसवल्याचं मोठं अप्रूप आम्हाला वाटलं. त्याचे सिग्नल मिळण्यासाठी मात्र 60 फुट उंचीचा अँटेना उभारावा लागला. शेतकऱ्यांच्या जीवनातल्या क्रांतीला सुरवात झाली होती

राज्यातल्या या बदलात संगमनेर तालुक्यातल्या परिवर्तनाच्या या क्रांतीचे सूत्रधार दादाच होते. विद्यालयीन शिक्षणासाठी मी संगमनेरात आलो होतो. खेड्यातून शहरात शिकायला आलेल्या मुलांच्या घरुन जेवणाचे डबे येत असत. ते काम भल्या पहाटे रतिबाचं दूध सायकलवरुन शहरात आणणारे दुधवाले करीत. माझा जेवणाचा डबा भिकाजी बोरकर आणायचा. सकाळी सात वाजता माझा डबा पोहच व्हायचा. माझ्या डब्यात दोन लिटर दुध आणी तब्बल पाच जणांची भुक भागवील इतकं मोठं भाकरीचं पेंडक असायचं. त्यात चपाती, भाकरी, भाजी, चटणी असा जामानिमा असल्यानं, अडल्या नडल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय व्हायची. त्यासाठी बाई रात्रीच पूर्वतयारी करुन पहाटे तीन वाजताच स्वयंपाकाला जुपायची. तीचा हा आटापिटा पाहून संगमनेरच्या लहानबाई गुंजाळ या मावशीने माझी चहापासून जेवणापर्यंतची सर्व व्यवस्था केली. या दोघींनीही एकमेकींची अडचण सोडवीत हा त्रास अनेक वर्षे काढला. ग्रामीण भागातल्या महिलांची कोंबड्या, अंडी, शेळ्यांची विक्री यातून स्वतःची बचत बँक असते. यातून गोळा केलेला रुपया दोन रुपये त्या कनवटीला लावून ठेवायच्या. त्यातून स्वतःचा खर्च चालायचा. शिलकीतून गुंज दोन गुंजा सोनं घेवून साठवायच्या. या हक्काच्या स्त्रीधनातून अनेक कुटूंबांना अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला. बाईचीही अशीच एक बचत बँक होती. त्यातून तिला चांगली मिळकत व्हायची. त्यातून मलाही दर आठवड्याला काही रक्कम खर्चाला मिळे. आजोबाही अधून मधून चांगले चुंगले खाण्यासाठी म्हणून काही पैसे द्यायचे. या दोघांकडून मिळणाऱ्या बोनसमुळं माझी आर्थिक स्थिती इतरांपेक्षा कायम बरी असे. पुढे पुण्याला महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गेलो. तेथील विधी महाविद्यालयातून वकील होईपर्यंत हा रतीब दोघांकडून सुरु होता. मी वकीलीची सनद घेवून गावी आलो. वकिली करण्यासाठी संगमनेरला जाण्यासाठी मोटारसायकलची गरज होती. पण दादांना म्हणायचं धाडस नव्हतं. माझी स्थिती बाईनं ओळखली तीच्या काटकसरीच्या रकमेतून पुण्याला जावून, साडेसात हजार रुपयांची लाल रंगाची राजदूत मोटारसायकल आणली. काळाच्या ओघात अनेक बदलांना आम्ही सामोरं जात होतो. एव्हाना दादा आमदार झाले होते. माझा विवाह होवून घरात कांचनच्या रुपानं लक्ष्मी आली होती. जीवनाच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती.

बाईचं शेतीच्या सर्व कामांवर पूर्ण नियंत्रण होतं. शेतीचे चार खाते, दहा अश्वशक्तीच्या चार मोटारींवर भरणे होई. सकाळी प्रत्येक खात्याच्या कामावरचा माणूस हजेरी देई. खतांच्या किती गोण्या गेल्या किती राहिल्या, जनावरांचा चारा पाणी, दुध या प्रत्येक गोष्टीवर तिचं नियंत्रण होतं. घराच्या पहिल्या मजल्यावरील व्हरांड्यातून मोठ्या आवाजात सूचना देण्याचे तिचं काम सुरू असे. निव्वळ हाकेनं पुढच्या माणसाला घाम फोडण्याची धमक त्या आवाजात होती. तिला कोणी प्रत्यूत्तर देत नसे. मजुरांचा कामाचा पगार वेळच्यावेळी करण्यावर तिचा कटाक्ष असे. दरम्यान सर्व बहिणींची दिमाखात लग्न झाली होती. दुर्गाताईचा विवाह डॉ. सुधीर तांबे यांच्याबरोबर झाला होता. या सर्व लग्नात दादांनी समाजाला पोटभर जेवायला घालण्याचा आवडता कार्यक्रम केला. वकिली करताना माझ्यातला चळवळ्या कार्यकर्ता विकसीत होत होता. विज, पाणी, निळवंडे धरणासाठीचा मोर्चा यात मी दिवसभर गढून जायचो. दादा राज्य सहकारी बँकेचे चेअरमन झाले होते. बँक, कारखाना व इतर संस्थांच्या कामात ते व्यग्र झाले होते. त्यांच्यातला कुशल प्रशासक यशस्वी वाटचालीचा अमीट ठसा राज्य पातळीवर उमटवीत होता. राज्यातील प्रमुख मंडळींनी त्यांची एकसष्टी साजरी करण्याचा घाट घातला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतरावदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व देशाचे उपपंतपप्रधान यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते देखणा सोहळा झाला. ‘ डोळ्यांचं पारणं फिटलं ‘ अशा शब्दांत यशवंतरावजींनी त्या सोहळ्याचे कौतुक केलं. बाईंनी आयुष्यभर सुख दुःखात केलेली पाठराखण, दिलेली साथ यांचा उल्लेख सर्वच प्रमुख वक्त्यांनी न विसरता, आवर्जून केला. या समारंभामुळं ती हरखून गेली. कष्ट कारणी लागल्याचे भाव तिच्या नजरेत होते. मात्र त्यानंतरही तिची दिनचर्या व कामात फरक पडला नाही. ते अविरत सुरुच होतं. जीवनभर अविरत कार्यमग्न राहिलेल्या बाईचं व्यक्तिमत्व अफाट आहे. कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ती परिस्थिती, ते श्रम, त्याग याला मूर्त स्वरूप देण्याची ताकद माझ्या शब्दांत नाही, मात्र आज आम्ही जे काही आहोत त्यात तिचं योगदान फार मोठं आहे एवढं मात्र खरं !

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *