बिबट्याचे पहाटे दर्शन घडल्याने शहरवासीयात भीती !
संगमनेर : झुंजार न्यूज
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गोधनावर येथेच्छ ताव मारणारे बिबटे आता मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत. खाण्याचे आणि पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढल्याने सदरचे बिबटे शहरातील मानवी वस्तीकडे चाल करू लागल्याने शहर वासियात भीती निर्माण झाली असून असाच एक बिबट्या संगमनेर महाविद्यालयाच्या गेटवर पहारा देत असल्याचे चित्र काल बुधवारी पहाटे अनेकांच्या नजरेस पडले.

संगमनेर तालुका आणि गावोगाव बिबटे हे जणू समीकरणच बनले आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रत्येक गावात चार सहा बिबटे हमखास आढळतात.ग्रामीण भागात बिबट्यांना खाण्या पिण्याची अडचण नसल्याने शक्यतो बिबटे ग्रामीण भागात आपला तळ ठोकून असतात. बिबट्यांना लपण्यासाठी आवश्यक असणारी ग्रामीण भागात असणाऱ्या शेतकऱ्यांची ऊस पिके कारखान्याने तोडून नेल्याने अनेक ठिकाणी शेतजमीन बोडखी दिसते, तेथे बिबट्यांना लपण्यासाठी सध्या जागा नाही,त्यातच एप्रिल महिना उजाडला आणि तालुक्यातील काही गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले, त्यामुळे जंगलचा हा राजा ग्रामीण भागाकडून शहराकडे धाव घेऊ लागला आहे.त्याचा प्रत्यय काल बुधवारी पहाटे शहरातील तसेच महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आला. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर शहरात संगमनेर महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या भिंतीच्या कंपाउंड शेजारी नवीन झालेल्या रस्त्याच्या,नवीन पादचारी रस्त्यावर सदरचा बिबट्या भक्षाच्या शोधात बसून होता. सदरची बाब या महामार्गाने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांच्या लक्षात आली,त्यावर या प्रवाशांनी आपले वाहन थांबवून आपल्या वाहनातून मोबाईल मध्ये बिबट्याच्या छबी टिपण्यास सुरुवात केली. त्यामुळे बिबट्या गांगरला आणि त्याने संगमनेर महाविद्यालयाच्या पश्चिमेला धाव घेत अंधारात तो दिशेनासा झाला.

या घटनेने शहरवासीयात दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान भल्या सकाळी शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असतात.त्यांच्या सुरक्षेची काळजी घेत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

