संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ठाकरवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल क्लासरूम उद्घाटन सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संरपच गणपत हजारे यांच्या हस्ते संप्रन्न झाला .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पानोडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक विनायकराव थोरात हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गणपतराव हजारे सर उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेला विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे या भावनेतून ठाकरवाडी ग्रामस्थांच्या आर्थिक सहकार्यातून स्क्रीन प्रोजेक्टर व 32 इंच एलईडी टीव्ही देण्यात आला व शाळेचे दोन्ही वर्ग डिजिटल करण्यात आले. या डिजिटल स्कूलचे उद्घाटन पालक, ग्रामस्थ वरवंडी केंद्रातील केंद्रप्रमुख शिक्षक वृंद व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाले.

यावेळी वरवंडी केंद्राचे सहाय्यक केंद्रप्रमुख विनोद बोरे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे , गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे , केंद्रप्रमुख अशोक गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही शिक्षकांच्या अथक परिश्रमातून ठाकरवाडी शाळेची गुणवत्ता भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस होत असलेली प्रगती याबद्दल गौरव उद्गार काढले .
सरपंच गणपत हजारे यांनी संगणकाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे या हेतूने ग्रामस्थांनी लोक सहभागातून शाळेला डिजिटल क्लासरूम उपलब्ध करून दिल्याबद्दल पालक व ग्रामस्थांचे तोंड भरून कौतुक केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक थोरात यांनी शाळेच्या विकासासाठी व ठाकरवाडी ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू असा विश्वास ग्रामस्थ व पालकांना दिला.
यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष निलेश हारदे यांनी शाळेत व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत झालेल्या आमुलाग्र बदलाबद्दल समाधान व्यक्त केले. खांबे शाळेचे शिक्षक अशोक शिंदे यांनी विद्यार्थी, शिक्षक व शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नरेंद्र दुस्सा यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू कोळपे यांनी तर आभार रामनाथ मेंगाळ यांनी मानले.
