फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते.
मुंबई : झुंजार न्यूज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने देण्यात येणाऱ्या फेलोशिपसाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते.
त्या आंदोलनाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत 861 विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरिता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
या मागणी संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि शिष्टमंडळाचे प्रतिनीधी उपस्थित होते.
यावेळी ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनीही मुख्यमंत्र्याचे आभार मानले आहेत. यापुढे फेलोशीपसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात यावी अशी मुद्दाही मुख्यमंत्र्यांसमोर विद्यार्थ्यांना मांडला.
फेलोशीप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते.
यावेळी विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी, सारथी, टीआरटीआय,महाज्योती या संस्थांच्यावतीने पीएचडीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरिता एक सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
