संगमनेर : झुंजार न्यूज

सदाचरणाने लोकव्यवहार सुरळीत होऊन बंधुता वाढीस लागते. त्यासाठी सदाचरण हे लोकांचे महत्वाचे कर्तव्य असुन सदाचरण म्हणजेच धम्म होय. धम्म ही मौलिक रूपाने आणि अनिवार्यपणे सामाजिक संकल्पना आहे.त्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रबोधन चळवळ उभी राहिली पाहिजे असे प्रतिपादन अनिल मुन्तोडे यांनी केले.


आश्वी येथील गुणवंत विद्यार्थी सत्कार व विशेष महिला प्रबोधन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी सांगितले. मुन्तोडे म्हणाले की, धम्म ही संकल्पना ज्याला धर्म म्हणतात त्या संकल्पने पेक्षा मौलिक दृष्टीने भिन्न आहे. धर्म ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील वैयक्तिक बाब आहे.म्हणुन प्रत्येकाने आपला धर्म आपल्यापुरताच सीमित ठेवावा. आपल्या धर्माला सार्वजनिक जीवनात हस्तक्षेपाची अनुमती देऊ नये. माणूस एकटाच असेल तेव्हा त्याला धम्माची आवश्यकता नसते. परंतु परस्पर संबंधित दोन जरी माणसे एकत्र येत असतील तर त्यांची इच्छा असो वा नसो तेथे धम्म विद्यमान असतो. कोणाचीही त्यातून सुटका नाही. लोकशाही राष्ट्रातील लोकव्यवहार सुरळीत चालण्यासाठी
समाजाला तीन पैकी एक पर्याय स्वीकारावाच लागतो.


१) समाजाने धम्माची निवड केली नाही तर अराजकतेचा मार्ग स्वीकारला आहे असे समजावे.
२) लोकव्यवहार सुरळीत चालवण्यासाठी नेहमीच पोलीस व्यवस्था अथवा बळाचा उपयोग करणे हे शासनाचे साधन असेल तर असे शासन म्हणजे हुकुमशाही व्यवस्था होय.
३) लोकव्यवहार सुरळीत चालण्यासाठी धम्म आणि न्यायव्यवस्थेची व्यवस्था कार्यरत आहे.तेथे दिर्घकाळ स्वातंत्र्य अबाधित राहील. जिथे धम्माचे पालन होणार नाही, तेथे न्यायदानाचा अधिकार असलेला मुलकी अधिकारी.पहिल्या दोन पर्यायांची निवड करील म्हणजे स्वातंत्र्याचा लोप होईल. म्हणून स्वातंत्र्यासाठी व सुदृढ लोकशाहीसाठी धम्म अनिवार्य आहे.


यावेळी संगिता शिंदे यांनी त्यागमुर्ती माता रमाई यांच्या त्यागाची आठवण करून देताना सांगितले की,आजचा शिक्षित महिला वर्ग बाबासाहेब आंबेडकरांनी भावी पिढीचा उद्धार करण्यासाठी निर्माण केला आहे.महिलांनी समाजोध्दाराचे कार्य आपल्या हाती घेतले पाहिजे. यावेळी साधना खरात व वर्षा मुन्तोडे व दिलीप बर्डे यांनीही मार्गदर्शन केले.

यावेळी दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवले त्याबद्दल साक्षी मुन्तोडे, हर्षदा मुन्तोडे व काजल मुन्तोडे यांचा पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पवार यांच्या हस्ते त्यांच्या आई वडिलांसह जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना साक्षी, हर्षदा व काजल यांनी सत्कार भावी आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरेल असे सांगितले तसेच यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू व समाज ऋणाची परतफेड करू असे आश्वासन दिले. आश्वी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की विद्यार्थ्यांनी आयुष्यात उच्च ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी कठोर प्रयत्न केले पाहिजेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यागमुर्ती माता रमाई यांच्या प्रतिमांना कलाबाई मुन्तोडे, सोनाबाई मुन्तोडे व संगिता मुन्तोडे यांनी प्रतिमांचे पुष्पपुजन केले. प्रास्ताविक भाषणात राजेंद्र मुन्तोडे म्हणाले की, महापुरुषांच्या केवळ नावाचा जयजयकार करण्यापेक्षा त्यांचे अपुर्ण राहिलेले कार्य पुर्ण केले पाहिजे. सत्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल असेही त्यांनी सांगितले.

सुत्रसंचलन बबन मुन्तोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शकुंतला जाधव यांनी केले.समारोप प्रसंगी भोजन व खिरदान करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकनाथ मुन्तोडे, प्राचार्य जगदीश मुन्तोडे, निवृत्त पोलिस उपनिरीक्षक भागवत मुन्तोडे, बाळासाहेब मुन्तोडे,अमोल मुन्तोडे, सुधाकर मुन्तोडे,चंदन मुन्तोडे, दत्तराज मुन्तोडे, जेम्स मुन्तोडे, बंडु मुन्तोडे, रावसाहेब मुन्तोडे, प्रकाश मुन्तोडे, आकाश मुन्तोडे, सुशील मुन्तोडे,शुभम मुन्तोडे,प्रतिक मुन्तोडे, बाळासाहेब दरेकर व कलाबाई मुन्तोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed