मुंबई : झुंजार न्यूज
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादांसोबत शपथविधी सोहळ्यात दिसलेले राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे पुन्हा शरद पवारांकडे परतले आहेत. पण त्यांनी खासदारकीची राजीनामा देण्याचा मानस बोलून दाखवला होता. याबाबत पवारांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांनी आज पवारांची भेटही घेतली. या भेटीनंतर त्यांना पवारांनी महत्वाचा सल्लाही दिला.
पवारांच्या भेटीत त्यांनी काय सल्ला दिला हे सांगताना कोल्हे म्हणाले, “साहेबांचं म्हणणं होतं की हे सर्व चुकीचं आहे ही माझी जी भावना आहे तीच भावना अनेकांची आहे. अनेक मतदारांची, तरुणाईची भावना देखील हीच आहे. अशा परिस्थितीत आपल्याला या तरुणांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर शिरुर लोकसभा मतदारसंघातील लोकांनी तुझ्यावर पाच वर्षांसाठी हा विश्वास ठेवला आहे. आणखी आठ-दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अनेक कामं मार्गी लागली आहेत आणि काही कामं मार्गी लागण्याच्या दृष्टीक्षेपात आहेत. यासाठी ज्या गोष्टींसाठी तुला विश्वास ठेवून निवडून दिलं ती जबाबदारी पूर्ण करावीत असं मार्गदर्शन त्यांनी केलं आहे.
अमोल कोल्हे अजित पवारांची साथ सोडून परत शरद पवारांकडं का आले? हे सांगताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत महाराजांनी कधीही स्वराज्य गहाण ठेवलं नाही. त्यांच्या भूमिका मी जगत आलो आहे, त्यामुळं हे चुकीचं असल्याची आपली भावना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे
