मणिपूर मधील घटनेच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये हजारो महिलांचा भव्य निषेध मोर्चा

संगमनेर 

 

 मणिपूर  राज्यामध्ये आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेर शहरात नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी काळ्या साड्या व काळे ड्रेस परिधान करून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे .ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून यामुळे जगात देशाची नाचक्की झाली असल्याचा तीव्र संताप नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला  आहे.

जय हिंद महिला मंच व संगमनेर मधील विविध महिला संघटनांच्या वतीने संगमनेर बस स्थानक ते नवीन नगर रोड- मेन रोड- चावडी मार्गे शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटनांच्या हजारो महिला काळ्या साड्या व काळे कपडे घालून सहभागी झाल्या होत्या.

याप्रसंगी सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, मणिपूरची घटनाही मानवतेला काळीमा फासणारी आहे .देशात महिला असुरक्षित झाल्या असून राजकारणासाठी जाती जातींमध्ये तेढ निर्माण केला जात आहे. कुकी  हा समाज डोंगरात राहत असून तो ज्या भागात राहतो आहे त्या डोंगरांमध्ये खनिज संपत्ती आहे. ही खरीच संपत्ती भांडवलदारांच्या घशात घालण्यासाठी तेथील गोरगरिबांना हाकलून देण्याकरता खोटे-नाट्य व्हिडिओ बनवून मणिपूर मधील विविध समाजांची डोके भडकवली जात आहे. यामधूनच आदिवासी गोरगरीब महिलांवर अत्याचार झाला असून तीन महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर सरकारला जाग आली आहे. झालेली घटना अत्यंत वेदनादायी आहे. यामुळे भारताची जगभरात प्रतिमा मलिन झाली आहे.

परदेशातून आता कोणीही महिला भारतात येण्यासाठी धाडस करत नाही कारण भारत महिलांसाठी असुरक्षित वाटत आहे.

 कोरोनाचे संकट वुहान मध्ये आले. मात्र ते कधी घरात आले कळले नाही. अशाच प्रकारचे हे संकट आपल्यावर येऊ शकते म्हणून प्रत्येक महिला भगिनीने जागृत राहावे समाजातील प्रत्येक घटनांकडे डोळसपणे पहावे असे आवाहनही त्यांनी केले.

तर मा.आ डॉ. तांबे म्हणाले की मणिपूरची घटनाही अत्यंत दुःखदायी आहे. मणिपूर मधील सरकार तातडीने बरखास्त करून दोषींना अत्यंत कडक शिक्षा झाली पाहिजे.
राजकारणासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीयतेचे राजकारण केले जात आहे. आणि याचे बळी गोरगरीब आणि महिला ठरत आहेत. केंद्र सरकारने तातडीने या घटनेची जबाबदारी घेऊन यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

 यावेळी संगमनेर मधील विविध महिला मंडळे व महिला  संघटनांच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

याप्रसंगी ॲड .रंजना गवांदे, ॲड .ज्योती मालपाणी , ॲड निशाताई शिवूरकर ,प्रा हिरालाल पगडाल, डॉ मैथिली तांबे यांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

या निषेध मोर्चा नंतर कु. अहिल्या सत्यजित तांबे हिच्या हस्ते पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले.

चौकट

१) मणिपूर घटनेचा आ. थोरातंकडून निषेध

मणिपूर मधील घटना ही अत्यंत वेदनादायी असून मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत असून दोशींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे

 २) देशातील महिलांच्या रक्षणार्थ राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठवण्यात येणार

देशाच्या राष्ट्रपती ह्या आदिवासी समाजातील महिला असून काही राज्यांमध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार ही अमानवीय आहे. महिला सुरक्षिततेचा देशभर महत्त्वाचा मुद्दा झाला असून याबाबत केंद्र व राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याबाबत राष्ट्रपती द्रोपदीची मूर्ख यांना संगमनेर मधून हजारो महिलांच्या वतीने पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *