शिर्डी । झुंजार न्यूज
राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम येत्या गुरुवारी 17 ऑगस्टला नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे पार पडणार आहे. मात्र, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तारीख उपलब्ध होत नसल्याची चर्चा होती. पण अखेर शिर्डी येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी तारीख मिळाली असून आता ‘सीएमओ’ कार्यालयाकडून मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस-प्रशासनाचे सर्व विभाग कामाला लागले आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी वर्ग धावपळ करताना दिसून येत आहे. स्वांतत्र्यदिनाचे शासकीय कार्यक्रम पार पडल्यानंतरही सुट्टीचा आनंद न घेता अधिकारी, कर्मचारी दिलेल्या जबाबदारी पाळण्यात मग्न झाल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडत असलेला भव्यदिव्य कार्यक्रम मात्र, मुख्य अतिथींच्या तारखा उपलब्ध होत नसल्याने सतत पुढे ढकलावा लागत असल्याची चर्चा होती. पण अखेर मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा ‘सीएमओ’ कार्यालयाकडून आल्यामुळे नगर जिल्ह्यात शिर्डी जवळील काकडी विमानतळ परिसरात ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम पार पडणार आहे.
महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ना राधाकृष्ण विखे यांच्याकडे या कार्यक्रमाचे नियोजन आहे. गेल्या जवळपास 20 ते 25 दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काकडी येथे या उपक्रमाचे नियोजन होत आहे.
रेड कार्पेटसह जवळपास तीस हजार लाभार्थी बसू शकतील, असा पावसाळ्यात सुरक्षित असा शामियाना तयार करून ठेवला आहे. तीस हजार लाभार्थ्यांना आणण्यासाठी 600 राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचे नियोजन तयार आहे. मात्र, तरीही शिर्डी येथील कार्यक्रम दोनदा पुढे ढकला गेल्याने चर्चां होती .
आता मुख्यमंत्री शिंदे यांचा अधिकृत दौरा आला असून पोलीस प्रशासनाने पत्रकारांना ‘सेक्युरिटी पासेस’ वितरण काम हाती घेतले आहे. मुख्यमंत्री 17 ऑगस्ट रोजी साडे अकरा वाजता विमानाने काकडी इथे पोहचणार आहेत. तर दोन तासांचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पार पाडून अडीच वाजता मुंबईकडे परतणार आहेत
