संगमनेर । झुंजार न्यूज
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सध्या गणेशोत्सवाचा आनंदाचा काळ सुरू आहे. याच काळामध्ये अमृत उद्योग समूहातील सर्व सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहाने आपण घेत आहोत .राज्यात कुठे नाही अशा सुंदर व मोठ्या संख्येने होणाऱ्या या सर्वसाधारण सभा आहेत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था वाटचाल करत असल्याने देशातील सहकारासाठी दिशादर्शक ठरल्या आहेत.
रिझर्व बँकेचे अनेक बंधने असून अमृतवाहीनी बँकेने अत्यंत गुणवत्ता पूर्ण कामकाज करत वाटचाल सुरू ठेवली आहे. संगमनेर मध्ये सहकारी बँका व पतसंस्थांचे मोठे जाळे असून सुमारे 5000 कोटींच्या ठेवी या बँक व पतसंस्थांमध्ये आहेत. ग्रामीण समृद्धी, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था या सर्वांमुळे संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे .राज्यातील सर्व ब्रँडच्या बँका, पतसंस्था, विविध व्यावसायिक संगमनेर मध्ये आले आहेत हे संगमनेरच्या आर्थिक समृद्धीचे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले
तर सुधाकर जोशी म्हणाले की, अमृतवाहिनी बँक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर खुर्द व आश्वी बु येथे दोन शाखा सुरू करणार आहे. याचबरोबर बँकेने राजहंस दूध विकास योजनेअंतर्गत 750 शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज दिले आहे. सातत्याने तालुक्यातील नागरिकांना मदत करताना नवनवीन योजना राबवले आहेत मोबाईल ॲप ,डेबिट कार्ड ,एटीएम कार्ड अशा योजना राबवल्या आहेत . बँकेच्या सर्व सभासदांचा दोन लाख रुपयांचा अपघाती विमा काढला असून बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचा दहा लाख रुपयांचा अपघाती विमा ही काढण्यात येणार आहे. सर्वांच्या सहयोगातून आगामी वर्षात एक हजार कोटींचा व्यवसाय बँक करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर माधवराव कानवडे म्हणाले की ,सहकारात भाऊसाहेब थोरात यांनी कधीही तडजोड केली नाही. म्हणून कडक शिस्तीचा सहकार टिकला व वाढला .हाच संस्कार संपूर्ण महाराष्ट्रासाठी अनुकरणीय असल्याचे ते म्हणाले.
यावेळी संतोष हासे ,विष्णुपंत रहाटळ, बापूसाहेब टाक, स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब डांगरे, नवनाथ आरगडे , गणपतराव सांगळे, सौ सुनीता अभंग, आदींसह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीचे नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी यांनी केली. प्रास्ताविक चेअरमन सुधाकर जोशी यांनी केले स्वागत बापूसाहेब गिरी यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर व्हाईस चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे यांनी आभार मानले. यावेळी सभासद नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट – अमृतवाहिनी ॲप व डेबिट कार्ड चा शुभारंभ
अमृतवाहिनी बँकेने आधुनिक प्रणालीचा वापर करताना रिझर्व बँकेच्या परवानगीने स्वतःचे ॲप विकसित केले असून या ॲपचे व बँकेचे रूपे डेबिट कार्ड याचा शुभारंभ काँग्रेस नेते आ. थोरात यांच्या हस्ते झाला. या शुभारंभाच्या वेळीच बँकेच्या सर्व सभासदांच्या खात्यावर डिव्हिडंड वर्ग झाल्याचा मेसेज उपस्थित सर्वांसह तालुक्यातील सभासदांना मिळाला…
