अमृतवाहिनीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली
संगमनेर । झुंजार न्यूज
पंचायतराज व्यवस्थेसह ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करताना सहकार क्षेत्रासह साहित्य ,समाजकारण, शिक्षण ,कृषी, अशा विविध क्षेत्रात दिशादर्शक काम करणारे व राज्याच्या राजकारणातील मापदंड असलेले स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनीच महाराष्ट्राच्या विकासाचा पाया घातला असून ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मॉडेल स्कूलच्या प्रांगणात यशवंततीर्थ येथे 39 व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर प्रा. व्हि.बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश, डॉ बी एम लोंढे ,डॉ.मच्छिंद्र चव्हाण, डॉ मनोज शिरभाते, प्राचार्य सौ जे.बी. सेटटी, श्रीमती शीतल गायकवाड , डॉ. संजय मंडकमाले, नामदेव गायकवाड,नामदेव कहांडळ, जगन्नाथ गोडगे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, एकाच व्यक्तीमध्ये अनेक गुण असलेले स्वर्गीय यशवंतरावांचे व्यक्तिमत्व हे प्रेरणादायी होते. देवराष्ट्रे ते दिल्ली या त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी साधेपणा, नीतिमत्ता कायम जपली. कृतज्ञता, सुसंस्कृतपणा, समय सूचकता ,जाणीव , दूरदृष्टी या गुणांबरोबर त्यांना साहित्याची विशेष आवड होती. अनेक ठिकाणी त्यांनी अत्यंत खंबीरपणे व दूरदृष्टीने निर्णय घेतले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन देशाचे संरक्षण मंत्री होत असताना भारताला चीनच्या युद्धात विजय मिळवून दिला.
अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, उपपंतप्रधान असे केंद्रात विविध पदे भूषवताना त्यांना कधीही साधेपणा सोडला नाही. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीत मोठे योगदान त्यांचे राहिले. याचबरोबर राज्याच्या कृषी, औद्योगिक क्रांतीचा पाया त्यांनी घातला.

स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी सुसंस्कृत सहकाऱ्यांची राज्यात मोठी फळी उभी केली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वर्गीय यशवंतराव यांना कायम आदर्श मानले. आजच्या राजकारणातही यशवंतरावजी चव्हाण हे प्रत्येकाला आदर्शवत असून पुढील अनेक पिढ्यांसाठी त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात यशवंतपर्व कायम राहिले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
