संगमनेर । झुंजार न्यूज
प्रारंभी निर्यातशुल्क आणि नंतर कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने आता कांद्याच्या निर्यातीवर पूर्णत: बंदी घातल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी संगमनेर तालुक्यात उमटले. सरकारच्या निर्णयाने कांद्याचे दर दीड ते दोन हजार रुपयांनी गडगडल्याने संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत नगर – नाशिक महामार्गावर आंदोलन करत शेतकऱ्यांनी रास्तारोको केला . त्यामुळे तीन तास नगर – नाशिक महामार्ग ठप्प झाले .
कांद्याच्या सर्वात मोठ्या संगमनेर बाजार समितीत शेतकऱ्यांनी दर घसरण्याच्या धास्तीने आणलेला माल लिलावात सहभागी केला नाही. परिणामी या बाजार समितीत सकाळच्या सत्रात लिलाव बंद राहिले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर अकस्मात बंदी घातल्याचे तीव्र पडसाद संगमनेर , अकोले , सिन्नर या तालुक्यामध्ये उमटले. सरकारने शुक्रवारपासून निर्यातीवर पूर्णत: बंदी घातली. काही महिन्यांपूर्वी कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले होते. नंतर ते हटवून कांद्याचे निर्यात मूल्य ८०० डॉलर करून निर्यातीवर अप्रत्यक्ष नियंत्रण राखले गेले. या परिस्थितीत निर्यातीचे प्रमाण कमी झाले असताना आता पूर्णपणे बंदी घातल्याची परिणती दर घसरण्यात झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सकाळी संगमनेर बाजार समितीत लिलावाला सुरुवात झाली. आदल्या दिवशीच्या तुलनेत दोन हजार रुपये कमी दर व्यापाऱ्यांनी जाहीर केल्याने शेतकरी संतप्त झाले. नवीन लाल कांदा व उन्हाळ कांद्याच्या दरात व्यापाऱ्यांनी मोठी तफावत निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला. लिलाव बंद पाडून आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करण्यात आली. संगमनेर बाजार समितीत गुरुवारी कांद्याला प्रति क्विंटल ४१०० रुपये सरासरी दर मिळाला होता. शुक्रवारी १८०० रुपये दर देत कांद्याला २००० रुपयांपर्यंत घसरल्याने. शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत बाजार समिती समोरचं नगर – नाशिक महामार्गावर आंदोलन करत रस्ता रोको केला .
चौकट
केंद्र व राज्य सरकार म्हणतं की , हे सरकार शेतकऱ्यांचं मग शेतकरी विरोध निर्णय का ? घेतला जातो . हे धोरण चुकीचे !
कांदा उत्पादक शेतकरी
