नगर | झुंजार न्यूज

 

 डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन, विळदघाट, अहमदनगरच्या निसर्गरम्य प्रांगणामध्ये अयोध्या येथील श्री. रामललाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या ‘पवित्र मंगल अक्षता कलश दर्शन व पूजनाचा’ सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 

यावेळी सुसज्जित अशा रथामधून आगमन झालेले पवित्र मंगल अक्षता कलश डोक्यावर घेऊन कार्यक्रमस्थळापर्यंत चालत नेऊन स्थापित केल्या. या दरम्यान उपस्थित सर्वांनी प्रभू श्रीरामांच्या जयघोषाने वातावरण अगदी दुमदुमून सोडले होते.

 

माझ्या नेतृत्वात आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रयत्नांनी संपन्न झालेला हा सोहळा अतिशय खास ठरला. आपल्या समृद्ध परंपरेचा वारसा जपून सर्वांनी श्रीरामांच्या आदर्शांचे पालन करूया असे आवाहन उपस्थितांना केले व अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने आगमन झालेल्या पवित्र कलशाचे मनोभावे दर्शन घेतले.

 

दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री श्री. आनंद गांधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतातून श्री राम मंदिरास राष्ट्र मंदिराची उपमा देत पवित्र मंगल अक्षता कलशाच्या महाविद्यालयीन परिक्रमेमध्ये उत्स्फूर्त भाग घेण्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांना आवाहन केले.

 

तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्यवाह श्री. दिनेशजी करंडे यांनी श्री राम मंदिराचा इतिहास अतिशय प्रभावीपणे सांगून आपल्या या देशाचा आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले. यासोबतच अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करून प्रभू श्रीरामांचा वास्तव असणाऱ्या आपल्या या भारतमातेच्या पवित्र भूमीची महती उलगडली.

 

या कार्यक्रमास डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे वैद्यकीय, फिजीओथेरेपी व नर्सिंग महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed