लोणी । झुंजार न्यूज

 

प्रवरेच्या कुशीत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पोटी जन्म घेऊन, सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेसाठी संपूर्ण आयुष्य अहोरात्र कष्ट करणाऱ्या या महान लोकनेत्यास स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली…!!! , विनम्र अभिवादन…!!!

 

ग्रामीण भागातील शेती, सहकार, शिक्षण, पाणी, रोजगार, यासह औद्योगिक विकासाचा ध्यास घेणारे आणि त्याची पुर्तता करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे स्वर्गीय खासदार साहेब यांच्या कामाची तुलना करणे अशक्य आहे. सामान्य जनतेबद्दल आस्था, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास, आणि इच्छा शक्ती असेल तर ग्रामीण भागात सुद्धा विकासाची गंगा पोहचवता येते हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले नव्हे ते सिद्ध केले.

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी समाजातील मुले शिकली पाहिजे या उद्दात हेतूने पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी सुरु केलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी नेली. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करताना भविष्यातील तंत्र युगात खेड्यातील मुले कमी पडू नये यासाठी प्रवरा परिसरात उभ्या केलेल्या तंत्र शिक्षणाच्या सोयी सुविधा पाहिल्या की साहेबांच्या दूरदृष्टीची कल्पना येते. ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भव्य अशा प्रवरा हॉस्पिटलची निर्मिती, ग्रामीण भागातील मुलांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे म्हणून सुरु केलेले वैद्यकीय महाविद्यालय या सारख्या सोयी सुविधांनी युक्त महाराष्ट्रातील ग्रामीण भाग हा बहुदा प्रवरा परिसर एकमेव असेल आणि हे सर्व स्वर्गीय साहेबांच्या कर्तृत्वाची आणि त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात.

 

शेती, शेतकरी आणि पाणी हा साहेबांचा जिव्हाळ्याचा विषय, पाण्याशिवाय शेती नाही आणि शास्वत शेती शिवाय शेतकरी सुखी आणि समाधानी होऊ शकत नाही असे ते नेहमी म्हणत. शेतकरी आणि शेती टिकवायची असेल तर शेतीला शास्वत पाण्याची सोय झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून प्रवरा नदीवर अनेक ठिकाणी बंधारे बांधले आणि त्याचा फार मोठा परिणाम प्रवरा परिसरातील ग्रामीण भागातील अर्थकारण सुधारण्यासाठी झाला.

 

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावरून पश्चिमेला वाहून समुद्रात जाणारे पावसाचे पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी त्यांनी कृती आराखडा तयार केला, त्यासाठी अनेक जलतज्ञाची मदत घेतली आणि त्या त्या काळातील सरकार कडे वेळोवेळी त्याबाबत पाठपुरावा देखील केला, परंतु त्या त्या वेळच्या प्रत्येक सरकारने या गोष्टिकडे खर्चिक प्रकल्प समजून गांभीर्याने कधीच बघितले नाही हे शेतकऱ्यांचे खरे दुर्दैव.

 

शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी भरीव कामगिरी बजावली, ग्रामीण भागात मराठी माध्यमासोबत इंग्रजी माध्यमातून बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारी “प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था” बहुदा एकमेव असेल. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, बायोटेक्नॉलॉजी, आयटीआय, कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यकीय शिक्षण या सारखी केवळ शहरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेली पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणारी महाविद्यालये लोणी सारख्या ग्रामीण भागात ऊभी करून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली.

 

सहकार, शिक्षण, सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उतुंग स्वरूपाचे आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष ते केंद्रात कॅबिनेट मंत्री हा प्रवास आणि त्यांच्या या प्रवासात त्यांना मिळालेले सामान्य कार्यकर्ते हे त्यांचे शक्तिस्थळ होते. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी जे काही मिळवले ते सर्व त्यांनी या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला निस्पृह भावनेने समर्पित केले.

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात सर्व पक्षात त्यांचे खंदे समर्थक होते. आणि आजसुद्धा ते सर्व कार्यकर्ते विखे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येते त्याचे कारण म्हणजे स्वर्गीय खासदार साहेबांचा स्वभाव आणि त्यांचे कार्य हेच आहे. कार्यकर्ते कसे घडवावे हे साहेबांकडून शिकण्यासारखे होते.

जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणात देखील साहेबांनी अनेकांना मदत केली. अनेकांची राजकीय कारकीर्द घडविण्यास मदतीचा हात दिला. त्यातील काहींनी जाणीव ठेवली तर कित्येकांनी त्यांना दगा सुद्धा दिला. जनतेच्या प्रश्नावर स्वपक्षीयांविरोधात देखील ते उभे राहिले त्यामुळे व्यक्तिगत राजकीय आयुष्यात त्यांचे फार मोठे नुकसान झाले पण साहेबांनी त्याची कधीच पर्वा केली नाही, कारण सामान्य जनता नेहमी त्यांच्या सोबत राहिली. स्वर्गीय साहेबांनंतर अनेक खासदार या जिल्ह्याने पहिले पण आजसुद्धा सर्व सामान्य जनतेसाठी स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील हेच खासदार आहेत.

 

केंद्र सरकारकडून सन्मान पूर्वक देण्यात आलेला पद्मभूषण पुरस्कार हा साहेबांच्या शेती, सहकार, शिक्षण, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची पावतीच आहे असे म्हंटले तर वावगे होणार नाही.

 

संपूर्ण प्रवरा परिसर पहिल्यानंतर असं लक्षात येते की, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले ते स्वप्न साकार करण्याचे काम स्वर्गीय खासदार साहेबांनी केले असेंच म्हणावं लागेल.

 

अशा या सर्वव्यापी व्यक्तिमत्वास, विकासाची दूरदृष्टी असलेल्या आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक विकासाचा ध्यास घेतलेल्या महान लोकनेत्यास त्यांच्या ७ व्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली…!!!
विनम्र अभिवादन…!!!💐💐🙏🏻🙏🏻

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed