संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील जोर्वे माझे माहेर, गावातील थोरात कुटुंबाला मोठी प्रतिष्ठा. गावची पाटीलकी आजोबा संतुजी पाटील पुरोगामी विचारांचे इंग्रजी मेट्रीक झालेले. जातपात न पाळणारे. वाचनाची प्रचंड आवड. वडील भाऊसाहेब थोरात व आई मथुराबाई यांची मी सर्वात धाकटी मुलगी. नाजूक उंचीने जरा कमी घरात सामाजिक वातावरण, पाहुणे, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, माझी आई सर्वांची विचारपूस करायची. चहा, जेवण, मुक्कामी कार्यकर्त्यांच्या आंथरुण, पांघरुणाची सोय लावली की नाही. हे ती स्वता पाहायची त्यांच्या कृतीतून आम्ही भांवड घडत गेलो. .

…”अस्से सासर सुरेख बाई”
माझे शिक्षण पूर्ण झाले आणि माझ्यासाठी स्थळं सूचविले जावू लागली. माझे आते भाऊ अनिल अण्णासाहेब शिंदे यांनी डॉ.सुधीर तांबे यांना सेट लूक हॉस्पीटलला इंटर्नशिप करतांना बघितले होते. त्यांनी माझे बंधू बाळासाहेब यांना सांगितले. डॉ.तांबे फार चांगले आहे. कष्टाळू आहेत. दुर्गासाठी बघा. डॉ.तांबे स्थळ बघायला आले. ते एमएस करत होते. मी रहायला साधी. कपाळाला कूंकू हातात बांगड्या, लांब केसाची एक मोठी वेणी त्यांनी आधी खूप मुली पाहिल्या होत्या. पण त्यांना साधी राहणारी मुलगी पाहिजे होती. त्यांना मी पसंद पडले मात्र गडबडीत उंची विचारायचं विसरुन गेलो. अस ते आजही म्हणतात. अस्से सासर सुरेख बाई तांबे परिवार तेव्हाच्या श्रीरामपुर तालुक्यातील दाढ बुद्रुकचा. माझे सासरे भास्करराव तांबे (अण्णा) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये व्हॉलिटियर शिक्षक म्हणून काम करायचे. त्यामुळे ते त्या भागात भिका मास्तर म्हणून प्रसिध्द होते. माझ्या सासूबाई प्रयागाबाई त्या काळातील सातवी शिकलेल्या सासरे नंतर ग्रामसेवक झाले. नोकरी निमित्त त्यांचे खूप फिरणे झाले. मुलांच्या शिक्षणासाठी कुटुंब सगमनेरला हलवलं.पुढील शिक्षणासाठी मुलांना पुण्यात पाठवलं. डॉ.तांबे पहिल्यापासून अतिशय अभ्यासू, शिस्तीचे. त्यांनी एमबीबीएसला प्रवेश मिळविला. संपूर्ण शिक्षण स्कॉलरशिपवरच झाले. उलट उरलेले पैसे ते घरी वडीलांना मनी ऑर्डरने पाठवत. ग्रामसेवकाच्या नोकरीत खोटेनाटे पटले नाही. म्हणून तडकाफडकी राजीनामा देवून अण्णा घरी आले. मग त्यांनी उत्कृष्ट शेती केली. एकरी ११० टन ऊस काढला. त्यात त्यांनी अनेक बक्षीस मिळविली. अशा सुशिक्षीत परंतू शेतकरी कुटुंबात मी आले. डॉक्टरसाहेब त्यावेळी एमएसच्या पहिल्या वर्षाला होते. मी दाढला सासू सासर्यांसोबत राहत होते. सासूबाई खूप प्रेमळ. मी आयुष्यात एकही उपास केलेला नाही. वडिलांच्या पुरोगामी विचारसरणीत वाढलेली. सासूबाईंनीही उपवास कर असा कधीही आग्रह केला नाही.

डॉक्टरांना लहानपणापासून सामाजिक कार्याची खूप आवड ते नेहमी सांगतात. चौथीत असताना भारत पाकिस्तान युध्द सुरु झालं. पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींनी जनतेला आवाहन केलं की भारताला तातडीने नॅट विमान खरेदी करायचे आहे. त्याची किमत २५ लाख रुपये होती. या सर्व बारक्या मित्रांनी एक डबा तयार केला व बाजारात फिरुन २७ रुपये आणि काही पैसे जमा केले. बीजे मेडिकलला असताना त्यांनी व नगरच्या डॉ.सुभाष म्हस्के यांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी निधी गोळा करुन मदत केली. अशा सामाजिक कार्याची त्यांना पहिल्यापासून आवड. विवाहाच्या वेळी त्यांनी अनेक गोष्टी टाळल्या. कारण त्यांचीही विचारसरणी पुरोगामीच. मात्र खंडोबाच्या दर्शनाला गेल्यावर मला पाच पायर्या उचलून घ्यायला विसरले नाहीत.

संगमनेरला प्रॅक्टीस करायला आल्यावर भाऊंच्या मदतीने जागा शोधली. गरजूंना ताबडतोब मदत करणे हा त्यांचा स्वभावच. पेशंटला १०- २० रुपये कसे मागायचे ? ते त्यांना पटेन. कुणी आग्रहाने फी देऊन जात.पेशंटला औषधाला पैसे नाहीत कळले. की ते लगेच देत त्यांची वृत्ती खूपच कष्टाळू गरज खूप कमी ते दोन दोन दिवस रात्रंदिवस हॉस्पीटललाच झोपत. ऑपरेशन करत ते निष्णात सर्जन. त्यांचे जिवलग मित्र डॉ.देवेंद्र ओहरा यांचं घर जवळच असल्याने घरी घेऊन जात डॉक्टरांची खूप काळजी घेत.

…”भाजी भाकरीच आवडते”
भाजी भाकरीच आवडते साहेबांच्या फार आवडी नाहीत. साधी भाजी भाकरी हा त्यांचा आहार आहे. दादा आजारी असतांना त्यांनी फार काळजी घेतली, त्यांच्या मार्गदर्शनाने मी ‘जयहिंद महिला मंच’ ची स्थापना केली. त्यांनी मला वेळोवेळी महिला बचतगट तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले. व त्यातून महिला बचत गट चळवळ शहरात व तालुक्यात वाढली. महिलांचे संघटन वाढले.

…..”कल्याण झाले माझे”
हॉस्पीटलला रोजच्या रोज जाऊन राऊंड घेणे. हा डॉक्टरसाहेबांचा नियम आहे. पेशंटला बारीक तपासणार. लगेच सहायकाला अचूक सांगणार. हजारो पेशंटची त्यांच्यावर खूप श्रध्दा आहे. डॉक्टरांना बघूनच काही रुग्णबरे होतात डॉ.तांबे खरोखर एक सजन व्यक्तिमत्व आहे. मला नेहमी म्हणणार, “ऐक माझे कल्याण होईल तुझे” डॉक्टर तांबे पती मिळण्यासाठी मी हरतालिकेसारख व्रत, काहीही उपासतापास केले नाहीत. परमेश्वराने मात्र मला बुध्दीमान, सजन, प्रेमळ पती दिला. म्हणून मी आभार मानते. डॉक्टरी पेशाबरोबरच त्यांना शेतीची खूपच आवड. ते उपजतच शेतकरी असल्याने प्रयोगशील शेतकरी आहेत. आधी गुलाबाची शेती केली, बंदिस्त शेळीपालन डाळिंब शेती नंतर कुक्कटपालन, परत आता डाळिंब शेती. काही ना काही शेतीमध्ये प्रयोग करीतच राहतात. यातूनच १९८५ मध्ये छोटीशी ब्राउन पेपरची मिल चालू केली. अशी खूप उद्योगशीलता, नव नवीन संकल्पना सतत विचारात चालू असतात.

…आणि “श्रीयुत विसरभोळे”
डॉक्टरांना कामाचा कधी विसर पडत नाही. मला मात्र विसरुन जातात. कार्यक्रमाला जायचे असेल मी आवरुन तयार असले तर कार्यक्रमात पोचल्यावर त्यांना ते आठवते. सर्वांचे वाढदिवस आठवतील. माझा व आमच्या लग्नाचा वाढदिवस मात्र पूर्ण विसरणार ते नगराध्यक्ष असताना आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी संध्याकाळी पूरण पोळी केली. छान साडी नेसून तयार झाले. रात्रीचे दहा वाजले, तरी घरी आले नाहीत. उशिरा आले मी म्हणाले.चला आता जेवण करायला. पुरणपोळी केली आहे. ते म्हणाले आज काय विशेष मला भूक नाही. आम्ही नगरसेवकांनी भेळ खाल्ली. मग पूर्ण स्थिर होऊन उभी राहिले. म्हटल. अहो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे.

आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उत्तम आरोग्य मिळो राजकीय व सामाजिक कार्य त्यांच्या हातुन घडो ही परमेश्वर चरणी पार्थना…!
सौ.दुर्गा सुधीर तांबे,
अध्यक्ष, जयहिंद महिला मंच,
मा. नगराध्यक्ष, संगमनेर नगरपरिषद, ता.संगमनेर,
जि. अ.नगर.
