संगमनेर । झुंजार न्यूज
काॅम्रेड सहाणे मास्तर हे साम्यवादी, मार्क्सवादी विचारांचे होते, विचारांवर त्यांनी कधीच तडजोड केली नाही, आदिवासी, शेतकरी, श्रमिक, कामगार, कष्टकरी वंचित उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेले महान कर्मवीर होते, काॅ. सहाणे मास्तर यांनी कामगार चळवळीचे नेतृत्व करताना औद्योगिक शांतता, कामगार व कारखानदार यांच्यातील सामंजस्य राखले, विशाल मनाचे ते होते, सुंसंवादाने प्रश्न सोडविण्यासाठी हातखंडा होता मात्र आजच्या काळात सुसंवाद राहीला नाही त्यामुळे जागतिक शांतता बिघडत चालली आहे असे प्रतिपादन नाशिक पदवीधर विधानपरिषदेचे माजी आमदार डॉ सुधीरजी तांबे यांनी काॅ. सहाणे मास्तर यांच्या आठव्या पुण्यतीथी व पुरस्कार वितरण सोहळ्यात केले. प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.
व्यासपीठावर मालपाणी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा राजेशजी मालपाणी, विषेश समाजसेवा पुरस्कार्थी अशोक देशमाने, कामगार युनियनचे अध्यक्ष काॅ. माधवराव नेहे, संघटनेचे सरचिटणीस कॉ. ॲड ज्ञानदेव सहाणे, काॅ. सहाणे मास्तर प्रतिष्ठान चे अध्यक्ष काॅ. सुभाष कडलग विराजमान होते.
डॉ तांबे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत स्व. ओंकारशेठ मालपाणी यांचे मार्गदर्शन लाभले, राजकीय व सामाजिक जीवनात त्यांचे सहकार्य लाभले ही सहाणे मास्तर व ओंकारशेठ यांच्याबाबतची कृतज्ञता विसरू शकत नाही. असे मत व्यक्त करत पुरस्कार्थीचा सन्मान करत त्यांना शुभेच्छा दिल्या. .
कार्यक्रमाचे अध्यक्षिय समारोपात राजेशजी मालपाणी यांनी म्हटले की कामातच राम पाहणारे आपले कामगार आहे म्हणत अयोध्येत राममंदिर सोहळ्यातील राम ते राष्ट्र, देव ते देश ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली यावर भाष्य केले, देश बलशाली होण्यासाठी आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलला पाहिजे, कामाला सुरुवात केली की देव मदतीला धावून येतो. बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी रहावो, ही साने गुरूजीचीं प्रार्थना अंमलांत येवो असे आवाहन उपस्थित पुरस्कार्थी व कामगारांना केले.
महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, उस तोड कामगार, शेतमजूर या मुलांचे संगोपन व शिक्षण करणारी संस्था ‘स्नेहवन’ चे अशोकजी देशमाने यांना विशेष सामाजिक पुरस्काराने तर कामगार क्षेत्रातील विषेश पुरस्कार रविंद्र गडगे व गुणवंत कामगार कार्यकर्ता पुरस्कार अर्जुन अरगडे, सौ रंजना उनवणे, सौ शिला वायकर यांना प्रदान करण्यात आला.
प्रतिष्ठान चे सचिव तथा मालपाणी उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक रमेश घोलप, देवदत्त सोमवंशी, रविंद्र कानडे, राहुल शेरमाळे, मंगेश उनवणे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनियोजन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड ज्ञानदेव सहाणे यांनी तर सूत्रसंचालन अर्चना शुक्ला व आभार प्रदर्शन सुभाष कडलग यांनी केले.
