संगमनेर । झुंजार न्यूज
सहकार महर्षि भाऊसाहेब संतुजी थोरात कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागांतर्गत “जैवविविधता संवर्धन व लोकवनस्पतीविज्ञान” एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, विद्यार्थी विकास मंडळ व सहकार महर्षि भाऊसाहेब संतुजी थोरात कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय वनस्पतिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी “जैवविविधता संवर्धन व लोकवनस्पतीविज्ञान” या विषयावर दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमिताने राज्यातील विविध महाविद्यालयातून विद्यार्थी व प्राध्यापक पोस्टर प्रेझेंटेशन व कार्यशाळेसाठी उपस्थित झाले होते. मा.आमदार व स. ब. वि. प्र. समाज संस्थेचे चेअरमन डॉ. सुधीर तांबे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.सदर कार्यशाळेच्या उद्घाटनानिमित्त पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपल्या अस्सल गावरान शैली मधे आपला जीवनप्रवास व पारंपरिक गावरान वाणांचे,(बीजबँक,) विविध रानभाज्यांचे महत्व व त्यांच्या संवर्धनाची आवश्यकता यावर विस्तृत असे विवचन केले. तसेच प्रश्नोत्तराचे सत्रात बीजमाता यांनी रानभाज्याविषयी माहिती देत आपला जीवनप्रवास उलगडून सांगत त्या पद्मश्री पुरस्कारास कश्या पात्र ठरल्या याविषयी आनंदी वातावरणात चर्चात्मक संवाद विद्यार्थी व बिजमाता यांच्यामध्ये घडून आला.उद्घाटनाचे सत्रात उपस्थित सर्व विद्यार्थी व मान्यवर बीजमाता यांना ऐकताना भारावून गेले.
प्रत्येकाच्या दारात एक देशी गाय, माती वाचवा, जैवविविधता संवर्धन करा, अनेक गंभीर आजारांचे मूळ हे आपल्या अन्नामध्ये असल्याने, आपले अन्न विषमुक्त केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त करत “ज्याची चमक लई, त्याच्यात धमक नाही” अशी नवीन म्हणच त्याप्रसंगी निर्माण केली.
निसर्गानुरूप शेतीचे नियोजन करणे, गावठी बियाणाला सावत्र वागणूक का? माती आजारी पडून संपली तर कोणता डॉक्टर उपचारासाठी आणायचा? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने, दिवंगत नातेवाईकांच्या स्मरणार्थ, लग्नसमारंभामध्ये रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धन करावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात संशोधक प्रा.विठ्ठल शेवाळे यांनी “जैवविविधता संवर्धनात प्लॅस्टिक व्यवस्थापनाची भूमिका” या विषयवार सर्वांना स्वताच्या कामातून प्रेरणा दिली व मार्गदर्शन केले. प्रसंगी त्यांनी सांगितले की, किमान आपल्या घरातील प्लॅस्टिक कचरा आपण सर्वांनी गोळा करून तो न जाळता त्याचे सुयोग्य व्यवस्थापन केले तर जैवविविधता संवर्धन सहज होईल.
दुपारच्या तिसऱ्या सत्रात एच. पी. टी. आर.वाय. के. महाविद्यालय नाशिक चे प्रो.डॉ. संजय औटी यांनी “मिलेटची विविधता, महत्व आणि संधी” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पश्चिम घाटातील अंजनेरी पर्वतावरील प्रदेशनिष्ठ, दुर्मिळ, गंभीरपणे धोक्यात असलेल्या विविध वनस्पती यांच्यावरील स्वता: बनवलेला एक माहितीपूर्ण लघु माहितीपट विद्यार्थ्यांना दाखवला.
यानंतर पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य व सा.फु.पु.वि.पुणे वनस्पतिशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. अनिल वाबळे यांनी “जैवविविधता संवर्धनात लोकवनस्पती विज्ञानाची भूमिका” या विषयावर संशोधनातील स्व: अनुभव सांगत पश्चिम घाटातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील विविध लोकोपयोगी औषधी वनस्पतींची सखोल माहिती यानिमिताने दिली.
तसेच कार्यशाळेच्या उत्तरार्धात जैवविविधतेवर आधारित पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेचे परीक्षण डॉ. संजय औटी, प्रा. विठ्ठल शेवाळे व प्रा. पाचोरे यांनी केले. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीसांचे पारितोषिक वितरण त्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले.
प्रसंगी कार्यशाळेसाठी उपस्थित झालेल्या मान्यवरांचे व उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी केले. त्यावेळी त्यांनी जैवविविधतेचे व देशाचे खरे मालक आदिवासी बांधव आहे आणि त्यांचा संवर्धनातील वाटा सर्वात जास्त आहे असे प्रतिपादन केले. कार्यशाळेचे समन्वयक व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. बाळसाहेब वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जैवविविधता संवर्धनाचे महत्व विशद केले. प्रसंगी संस्थेचे रजिस्ट्रार श्री. बाबुराव गवांदे,सेक्रेटरी श्री. लक्ष्मणराव कुटे, सहसेक्रेटरी श्री. दत्तात्रय चायस्कर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास कोल्हे, आय. क्यु. ए. सी. समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक श्री. गोरक्षनाथ पानसरे यांचे सहकार्य लाभले. वनस्पतिशास्त्र विभागातील प्रा. चांगदेव शिंदे, डॉ. पूर्णिमा साबळे, डॉ. महेश गुंजाळ, प्रा. नानासाहेब गुंजाळ, प्रा. श्रीनाथ भोर, प्रा. गौरी शिंदे व श्री. प्रवीण फटांगरे यांनी उत्तम नियोजन केले. महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. जयराम डेरे यांनी सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले व प्रा. नानासाहेब गुंजाळ यांनी सूत्र संचालन केले.
