संगमनेर । झुंजार न्यूज
निळवंडे धरण क्षेत्रात झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या कामांची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराला कुठल्याही प्रकारचे बिले अदा करु नये. अदा केलेली बिले त्वरित वसुल करावी. दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशा विविध मागण्यासाठी राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्यावतीने संगमनेर येथील जलसंपदा कार्यालयाच्या गेट समोर सोमवार दिनांक १८ मार्च २०२४ पासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.
प्रसिद्ध झालेल्या पत्रकात म्हटले आहे की, उर्ध्व प्रवरा धरण निळवंडे – 2 धरण क्षेत्रातील करण्यात आलेल्या सर्व कामांची चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत करावी व या ठिकाणी करण्यात आलेल्या खर्चाचे स्वतंत्रपणे लेखा परीक्षण करावे, निळवंडे धरण क्षेत्रात करण्यात आलेल्या कामांचे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या तत्कालीन कार्यकारी अभियंता व चितळवेढे येथील उपकार्यकारी अभियंता यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, निळवंडे धरण चितळवेढे येथील कार्यालयात अधिकारी व कर्मचारी मुख्यालयात राहत नसून त्यांना देण्यात आलेल्या वसाहती व या ठिकाणी करण्यात आलेल्या रस्त्याचे काम अतिशय बोगस व निकृष्ट दर्जाचे असून यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या कामाची त्वरित चौकशी करण्यात यावी, निळवंडे पुनर्वसन क्षेत्र ते पिंपरणे रस्ता कामांचे निविदा व अंदाजपत्रक रस्ता अंतरपेक्षा जास्त असुन सदर कामांचे फेरमुल्याकंन करावे. निळवंडे धरण क्षेत्रात कामांची चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराला कुठल्याही प्रकारचे बिले अदा करु नये. अदा केलेली बिले त्वरित वसुल करावी. दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
या आमरण उपोषणामध्ये राष्ट्रीय छावा संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष प्रवीण कानवडे व राष्ट्रीय मानवाधिकार एव आरटीआई जागरूकता संघटन भारत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोमनाथ नवले सहभागी झाले आहेत.
