संगमनेर । झुंजार न्यूज
कौठे धांदरफळचा शुभम घुले आणि पिंपळगाव खांड जवळील ठाकरवाडीचा रविंद्र गावंडे हे दोघे संगमनेर कॉलेजच्या डेअरी सायन्सचे विद्यार्थ्यांची गगन भरारी…त्यांच्या या गगन भरारीला शिक्षण प्रसारक संस्थेकडून मनःपूर्वक शुभेच्छा संजय मालपाणी यांनी दिल्या .
संगमनेर महाविद्यालयात अनेक बि-व्होक कोर्सेस चालवले जातात. ज्यामधे प्रत्यक्ष कार्यानुभवावर जास्त भर असतो व विद्यार्थ्यांना या अनुभवाच्या बळावर लगेच चांगली नोकरी देखील मिळते. अर्थात परिश्रमांची तयारी मात्र असावी लागते.

शुभम व रविंद्र या दोघांविषयी कॉलेजमधून माहिती मिळाली की डेन्मार्कमधे या दोघांना इंटर्नशिप करायची संधी मिळते आहे. मी त्वरित दोघांना बोलवून घेतले. संगमनेर तालुक्यातील अतिशय ग्रामिण भागातले हे दोघे विद्यार्थी. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेले. घरी जेमतेम शेती व दोन-चार गायी असल्याने डेअरी व्यवसायाची जुजबी माहिती त्यांना होती. त्यामुळे डेअरी सायन्स या कोर्सला त्यांनी प्रवेश घेतला. द्वितीय वर्षात शिकतांना इंटर्नशिपसाठी शिक्षकांच्या सांगण्यावरुन अर्ज केला. मुलाखत झाली. आणि या दोघांचीही डेन्मार्कच्या एका कंपनीत दिड वर्षासाठी निवड झाली. मी त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यायला उत्सुक होतो.

दोघे सोबतच भेटायला आले. इंटर्नशिपच्या कालखंडात त्यांना स्टायपन म्हणून सुमारे दिड लाख रुपये महिन्याला मिळणार होते. एका मोठ्या शेती आणि अन्नमाल उत्पादक कंपनीच्या शेकडो गाईंच्या गोठ्याचे व्यवस्थापन करण्याची संधी त्यांना मिळाली होती. पण एक मोठी अडचण होती. तेथे जाण्याचा आणि तेथील बँकेत खाते उघडण्यापर्यंत सुमारे तीन महिने तेथे रहाण्याचा खर्च करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. सुमारे पाच लाख रुपये यासाठी लागणार होते. घरुन व काही नातेवाईकांकडून तीन लाख रुपये मिळतील अशी अपेक्षा होती पण तरी देखील पैसे कमी पडणार होते.

दोघांचीही प्रचंड परिश्रमांची तयारी होती. काम करण्याचा आत्मविश्वास शिक्षणामुळे मिळाला होता. परदेशी जाण्याची प्रचंड इच्छा होती. पण परिस्थिती सगळी स्वप्नं पूर्ण करत नाही त्यामुळे गाडी अडली होती.
मी शिक्षण प्रसारक संस्थेच्या व्यवस्थापन समिती समोर हा विषय मांडला. सर्वांनी या दोघांना आवश्यक ती अर्थिक मदत देण्यासाठी मान्यता दिली. संस्थेने उभारलेल्या ‘विद्याधन कोषातून’ ही मदत द्यायचे ठरले. सहा महिन्यांनी ही मदत कोणतेही व्याज न आकारता परताव्याच्या बोलीवर मिळेल हे कळताच दोघांच्याही डोऴ्यात आशेचे किरण चमकले. चेह-यावर हास्य झळकले.
दोघांनाही प्रत्येकी दोन-दोन लाख रुपयांचे चेक विद्याधन कलश योजनेतून देण्यात आले. दोघांचेही व्हिसा व तिकिटे आली. पुढच्या महिण्यात हे दोघेही डेन्मार्कला रवाना होतील. संपू्णतः मशिन्सच्या सहाय्याने गाईंचा प्रचंड मोठा गोठा कसा सांभाळला जातो याचे प्रशिक्षण घेऊन ही मुले परत येतील. हे दिड वर्ष बिन भिंतिंच्या शाळेत प्रत्यक्ष कार्यानुभव घेतील. त्यानंतर त्यांची अंतिम परिक्षा होऊन त्यांना डिगरी मिळेल. परदेशातील अनुभव आणि योग्य शिक्षणाच्या बळावर तुमच्या-आमच्यातलेच रविंद्र आणि शुभम नव्या आसमंतात गरुडझेप घेतील.
या वर्षी संगमनेर कॉलेजच्या अशा सुमारे २० विद्यार्थ्यांना डेअरी, हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम अशा विविध कोर्सेसमधून परदेशी इंटर्नशिप करायची संधी मिळते आहे. अमेरिका, युरोप आणि गल्फ देशात ही मुले जाणार आहेत.
