नवी दिल्ली । झुंजार न्यूज
महाराष्ट्रातून कोणाला मिळाले कॅबिनेट मंत्रिपद ?
महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे. गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद खेचून आणले आहे.
महाराष्ट्रात कोणाला मिळाले राज्यमंत्रिपद?
महाराष्ट्राच्या वाट्याला यंदा 4 राज्यमंत्रिपद आली आहेत. भाजप खासदार रक्षा खडसे आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात राज्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर यांना पराभूत करत खासदार झाले. तर रक्षा खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा पराभव केला होता. याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनाही राज्यमंत्रिपद मिळवले आहे.
कॅबिनेट मंत्री – नितीन गडकरी, पियुष गोयल
राज्यमंत्रिपद – रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव”
