आश्वी । झुंजार न्यूज
एज्यूमिट अकॅडमी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षा (बीटीएस) २०२४ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यात संगमनेर तालुक्यातील निमोण येथील साई केशव घुगे यांची राज्यस्तरिय बीटीएस परिक्षेमधून इस्त्रो अभ्यास सहलीकरिता निवड झाली .

राज्यस्तरीय असणारी ही परीक्षा राज्यात सुमारे २५० पेक्षा अधिक केंद्रांवर घेण्यात आली.इयत्ता पहिली ते आठवीचे २०००० पेक्षा जास्त विद्यार्थी सदर परीक्षेस प्रविष्ठ झाले होते. यातील सर्व विद्यार्थ्यांमधून २८ विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. यात राज्यभरातून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये १५० पैकी १३६ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवून साई घुगे याची सदर अभ्यास सहलीसाठी निवड करण्यात आली आहे.

साई सध्या नामांकित अशा सातारा सैनिक स्कूल येथे शिक्षण घेत असून त्याने आतापर्यंत शिष्यवृत्ती परीक्षा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये क्रमांक,मंथन,नवोदय तसेच बऱ्याच स्पर्धा परीक्षामध्ये उज्वल यश संपादन केले आहे. साईचे वडील केशव घुगे व आई सुरेखा घुगे (आंधळे) दोघेही प्राथमिक शिक्षक म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी ता. संगमनेर येथे सेवा बजावत आहेत.

या यशासाठी सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन के. श्रीनिवासन, उपप्राचार्य लेफ्टनंट कर्नल मनिषा दबस, ऍडम ऑफिसर विंग कमांडर गौरव शेरॉन, वरिष्ठ शिक्षक प्रेम गेही , वर्गशिक्षक टिंगरे , विशाल साळुंके , आदर्श शिक्षक विक्रम अडसूळ , सातारा येथील अंजली गोडसे , दिपाली रेपाळ आदींचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल त्याचे राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांमधील व्यक्तींकडून अभिनंदन होत आहे.

