आश्वी । झुंजार न्यूज
पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा, यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील झपाट्याने कमी होत असलेली वृक्षसंपदा कायम राहावी व वृक्षांच्या संख्येत वाढ करावी, या उद्देशाने वन विभागाकडून दर वर्षी पावसाळय़ात विविध परिक्षेत्रांमध्ये झाडे लावली जातात त्याचं उद्देशाने संगमनेर तालुक्यातील चणेगांव क्षेत्रात वटपौर्णिमा निमित्ताने महीलांच्या हस्ते वडाचे झाड लावण्यात आले.
आगामी पावसाळय़ात वन क्षेत्रात नव्याने रोपांची लागवड करण्यात येणार आहे. बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे तापमानवाढ, दुष्काळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चणेगांव क्षेत्रात जंगलांत झाडाचे प्रमाण कायम राखणे गरजेचे असल्याने वनरक्षक हरिचंद्र जोजर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. या वर्षी ही संगमनेर वन क्षेत्र विभागीय अधिकारी संदीप पाटील , वन परिक्षेत्र अधिकारी सुभाष सांगळे , वनपाल सुहास उपासनी यांच्या मार्गदर्शनाखाली वट पौर्णिमा निमित्ताने चणेगांव येथील महिलांना एकत्र करत वन क्षेत्रा विभागात वडाच्या झाडाचे वक्षारोपन करण्यात आले .

