ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात

 

नगर l झुंजार न्यूज

 

 

ऊस तोडणी मजूर कुटुंबात जन्मलेल्या एकनाथ ढाकणे यांनी मोठा संघर्ष करीत आयुष्यात मोठी भरारी घेतली. ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत असताना त्यांनी गावांच्या विकासात मोलाचे योगदान दिले. ग्रामसेवक संवर्गाचे नेतृत्व करताना अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली. ग्रामसेवक प्रबोधन दिंडी सारखा उपक्रम राबवून सहकाऱ्यांना अध्यात्माचा आनंद मिळवून दिला.आता ते आपल्या मूळ गावी शेवगाव तालुक्यात शिक्षण क्षेत्रात योगदान देत आहेत. आताच्या काळात विकासकामांसाठी निधीची कमतरता नसली तरी गावांतील गटतटामुळे कामे करताना अडचणी येतात. सरपंच व ग्रामसेवक यांच्यातील समन्वय तसेच सर्वांना सोबत घेवून चालण्याची हातोटी आवश्यक बनली आहे. या गोष्टीत ढाकणे नेहमीच यशस्वी झाल्याने त्यांनी ज्या ज्या गावात सेवा दिली तिथे उत्कृष्ट काम केले, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

 

राज्यातील ग्रामसेवकांचे नेते एकनाथ ढाकणे 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेत. त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा माऊली सभागृहात पार पडला. याप्रसंगी पद्मश्री पोपटराव पवार बोलत होते. अखिल भारतीय सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळयाप्रसंगी महंत आदिनाथ शास्त्री महाराज, आ.डॉ.किरण लहामटे, आ.मोनिका राजळे, आ.सत्यजित तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, राहुल शेळके, आदर्श सरपंच भास्करराव पेरे, कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष शशिकांत रॉय, मध्यवर्ती सरचिटणीस विश्वास काटकर, जि.प.कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, प्रशांत जामोदे आदींसह ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकनाथ ढाकणे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. एकनाथ ढाकणे यांच्या जीवनचरित्रावरील ग्रामविकासाचा वारकरी या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात इतर 11 सेवानिवृत्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचाही सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.

 

आ.डॉ.किरण लहामटे म्हणाले, ढाकणे हे राज्यातील एकमेव ग्रामसेवक आहेत की ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत. अकोले, संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये त्यांनी आपल्या कामाने गावांचा कायापालट केला. ग्रामसेवक पदाची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम त्यांनी केले आहे.

 

सीईओ आशिष येरेकर म्हणाले, नगरला आल्यापासून एकनाथ ढाकणे यांचे संघटनेसाठीचे काम, त्यांची तळमळ जवळून पाहत आलो आहे. ग्रामसेवकांचे अनेक प्रश्न त्यांनी पाठपुरावा करून सोडवून घेतले. संघटनेचे काम पाहताना त्यांनी नेमणूक असलेल्या गावातही शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पंचसूत्री कार्यक्रमाची त्यांनी आपल्या गावात प्रभावी अंमलबजावणी केली.

आ.सत्यजित तांबे म्हणाले, मी सर्वप्रथम जिल्हा परिषद सदस्य झालो तेव्हा मला जास्ती काही माहिती नव्हते. परंतु एकनाथ ढाकणे व अन्य ग्रामसेवकांनी मला ग्रामीण विकासाच्या दृष्टीने खूप गोष्टी सांगितल्या. गावाच्या विकासात ग्रामसेवकाची भूमिका महत्वाची असते. ग्रामसेवकांच्या कामामुळेच आदर्श सरपंच निर्माण होतात. ढाकणे सेवानिवृत्त झाले असले तरी त्यांचा मूळ पिंड चळवळीचा असल्याने ते लोकांसाठी काम चालूच ठेवतील असा विश्वास आहे.

 

आ.मोनिका राजळे म्हणाल्या, ढाकणे यांनी आयुष्यात किती माणसे जोडली याची प्रचिती आजच्या या सोहळ्यात आली. त्यांचा संपूर्ण जीवनपट तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतरची दुसरी इनिंग ते समाजासाठी, संघटनेसाठी काम करून व्यतित करतील यात शंका नाही.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष लांबा यांनीही ग्रामसेवकांचे संघटन करून शासन दरबारी आवाज उठवत अनेक प्रश्नांची सोडवणूक ढाकणे यांनी कुशलतेने केल्याचे सांगितले. यावेळी महंत आदिनाथ शास्त्री महाराज, उमेशचंद्र चिलबुले, विश्वास काटकर आदींनी मनोगत व्यक्त ढाकणे यांना शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र पावसे यांनी केले. एकनाथ ढाकणे यांनी आभार व्यक्त करताना हा सोहळा आयुष्यभरासाठी संस्मरणीय राहिल असे सांगितले. कार्यक्रमास जिल्हयासह राज्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी गौरव सोहळा समितीचे अशोक नरसाळे, सुनिल नागरे, युवराज पाटील आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

गौरव सोहळ्यानंतर अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन एकनाथ ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत चर्चेअंती विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *