लहान मुलं हीच निरोगी आरोग्याचे ‘ब्रॅण्ड अम्बेसिडर’ – डॉ सुधीर तांबे
एसएमबीटीचा उपक्रम : रवींद्र विद्यालयात विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्याचे धडे
नाशिक | झुंजार न्यूज
कमी वयात वाढलेले आजार, निरोगी आरोग्याची बिघडलेली साखळी सुधारण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग असणे आवश्यक आहे. कुठल्याही घरात लहान मुलांवर जे संस्कार होतील तिथून ती पिढी कशी असेल याचा अंदाज लावता येणे शक्य होईल. म्हणूनच लहान मुलं हीच निरोगी आरोग्याचे ‘ब्रॅण्ड अम्बेसिडर’ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार आणि प्रख्यात डॉक्टर सुधीर तांबे यांनी काढले. ते नाशिकमधील रवींद्र विद्या प्रसारक मंडळाच्या रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व रवींद्रनाथ विद्यालयात एसएमबीटी मेडिकल कॉलेज आयोजित ‘कॅच देम यंग’ या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ऍड. मनोज पिंगळे, एसएमबीटीच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, मनुजा पिंगळे, कॉंग्रेसचे ज्ञानेश्वर गायकवाड, माजी नगरसेवक राहुल दिवे यांची उपस्थिती होती.





भारताइतके तरुण कुठल्याही देशात नाहीत. तरुण पिढी आजारी पडली तर देशाचे भविष्य धोक्यात आहे. विद्यार्थ्यांनी मानसिक ताण-तणावापासून दूर राहणे, मनाची एकाग्रता वाढवणे आणि नियमित योगा करणे आवश्यक आहे. शरीराला मनाशी जोडणे म्हणजे योग होय म्हणूनच योगाचे निरोगी जीवनात महत्वाचे स्थान आहे. वाढलेले साथीचे आजार, आरोग्यविषयी जनजागृती घडली पाहिजे या हेतूने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे
डॉ. सुधीर तांबे, माजी विधानपरिषद सदस्य

एसएमबीटी हॉस्पिटल येथे दर महिन्याच्या शेवटच्या शनिवार आणि रविवारी जन्मजात हृदय विकार असलेल्या लहान मुलांवर मोफत उपचार केले जातात. तसेच स्त्रीरोग विभागात मोफत गर्भसंस्कारासह सिझरियन तसेच नॉर्मल डिलिव्हरी मोफत केले जाते. तसेच लहान बालकांसाठी सुसज्ज अतिदक्षता विभाग याठिकाणी कार्यरत आहे. दरवर्षी शाळा दत्तक घेऊन या बालकांची नियमित तपासणी देखील याठिकाणी मोफत केली जाते.
