पाथरे l झुंजार न्यूज
आम्हाला घरात किंवा समाजात किंमत नाही असे कधीच समजू नका कारण प्रत्येक वयस्कर व्यक्तीची गरज प्रत्येक घराला आहे. त्यामुळे सद्याच्या परिस्थीतीत ज्येष्ठ आजी-आजोबांचे जीवन हे सखोल वैभवाचे आहे, त्याचा अर्थ ज्येष्ठ व्यक्तींनी समजून घ्यावा, ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे कुटुंबाचे कुलगुरू असतात असे मत प्रा. बारगुजे यांनी व्यक्त केले.
राहाता तालुक्यातील येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित आजी-आजोबा मेळाव्यात उपस्थित आजी-आजोबांच्या समोर महाविद्यालयाचे प्राचार्य बारगुजे सर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पाथरे गावचे माजी सरपंच मा. सोपान लक्ष्मण घोलप पाटील हे उपस्थित होते. तर व्यासपीठावर मा. भाऊसाहेब अंत्रे पाटील (मा. सरपंच सोनगाव) व विद्यालयातील विद्यार्थ्यांचे आजी आजोबा उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना कुटुंबातील मुलं जास्त वेळ आजी आजोबांसोबत घालवतात. खरे पाहता आजी आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. आजी आजोबा पहिले मित्रच असतात. नात्याची तेव्हा तिथूनंच खरी जडण-घडण होत असते. म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेल्या घट्ट नात्याची ओळख होणे आजच्या काळात महत्वपूर्ण असून हे नातं पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे व प्रेरणादायी आहे. आजी-आजोबाच्या अनुभवाचा उपयोग पुढील पीढी घडविण्यासाठी झाला पाहिजे. आपल्या नातवंडाच्या आई-वडीलांना वेळ नाही त्यांची कसर आजी-आजोबांनी भरून काढली पाहिजे. अनुशासन, संघभाव, सवयी, पारमार्थीक उपासना, कुलपरंपरा, राष्ट्राचा अभिमान, विश्वात्मक विचार मातृभाषा, मातृधर्म यांचा अभिमान नातवंडामध्ये निर्माण करा असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा भाऊसाहेब पाटील अंत्रे म्हणाले की, आजच्या पिढीवर सर्वांनी मिळून संस्कार केले पाहिजेत. घरात आजी-आजोबा असणं हे बँकेत ठेवलेल्या ‘फिक्स डिपॉझीट’ सारखे आहेत. यावरून त्यांचे घरातील स्थान महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर ही आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये आजी-आजोबांनी आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली. तसेच विविध प्रकारचे फनी गेम्स आपल्या नातवंडात सोबत उपस्थित आजी-आजोबांनी सेल्फी काढली. कार्यक्रमात कु. प्रियांका सिनारे, चैतन्य आव्हाड, अंजली पिलगर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते तर उपस्थित आजी आजोबांनी आपल्या कार्यक्रमाप्रति सकारात्मक भावना व्यक्त केल्या.
यावेळी कार्यक्रमासाठी प्राचार्य बारगुजे सर उपप्राचार्य वाणी मॅडम पर्यवेक्षक तांबे सर विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पडघलमल सर सूत्रसंचालन घोलप मॅडम व आभार शेळके मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

