जोर्वे गटात युवा संवाद यात्रेत डॉ थोरात यांचा इशारा
संगमनेर l झुंजार न्यूज

जोर्वे गटातील विविध गावांमध्ये जनसंवाद यात्रेदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधला यानंतर जोर्वे येथे झालेल्या भव्यसभेच्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर राहता तालुक्याच्या नेत्या सौ प्रभावती ताई घोगरे इंद्रजीत भाऊ थोरात यांसह संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावागावांमधून या युवा संवाद यात्रेचे भव्य उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, फोडाफोडी करून खोके देऊन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मागील अडीच वर्षात सत्ताधारी व पालकमंत्र्यांनी संगमनेर तालुक्यातील जनतेला मोठा त्रास दिला आहे. ॲट्रॉसिटी आणि खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ज्या वयात मुलांनी अभ्यास करायला पाहिजे. त्या वयात मुलांना वाईट सवयी लावल्या आहेत. शिर्डी मतदार संघातील गणेश कारखाना, दूध संघ ,राहुरी चे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. राहता तालुक्याची वाट लावणारे आता संगमनेरच्या विकासाबद्दल बोलता येत हे मोठे आश्चर्य आहे.

आमदार बाळासाहेब थोरात हे स्वच्छ व सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांनी कधीही कुणाला त्रास दिला नाही. विरोधकांचाही सन्मान केला. तुम्ही आमच्या तालुक्याच्या कुटुंबप्रमुखाबद्दल, माझ्या बापाबद्दल बोलाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशारा दिला आहे .जोर्वेच्या मातीमधून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, आमदार बाळासाहेब थोरात अशी मोठी माणसे घडली आहे. एक वेळ तुम्ही पराभूत होता होता वाचले. या 28 गावांनी पक्षनिष्ठा राखून तुम्हाला जगवले. आता मात्र सर्वांनी एकजुटीने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. राहता तालुक्यात सुद्धा आपल्याला स्वातंत्र्याची लढाई करायची आहे. तेथेही आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विचारांचा आमदार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे. त्रास तुम्ही देता, दडपशाही तुम्ही करता हे सर्वश्रुत आहे पण तुमची दडपशाही संगमनेर मध्ये चालणार नाही. आणि आपल्या तालुक्यातील काही घरभेदी आहेत त्यांनी तुम्ही कोणाला घरात घेताय हे पहावे असे आवाहन केले

सौ.प्रभावती ताई घोगरे म्हणाल्या की, विखे परिवाराच्या पायाखालची वाळू घसरली आहे. नगर दक्षिण मध्ये जर इतका विकास केला. तर तेथील लोकांनी का नाकारले .हे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. संगमनेर तालुका एकवटला आहे. आणि अहमदनगर जिल्हा जाणून आहे संगमनेरच्या अस्मितेला डिचवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा हा तालुका एकजूट होऊन लढला असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी विविध गावांमध्ये तरुणांनी जोरदार भाषणे केली.

याप्रसंगी जोर्वे गटातील विविध गावांमधील युवक ,महिला, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

