संगमनेर l झुंजार न्यूज
राहता मतदार संघ हा येथील प्रस्थापित नेत्यांच्या गुंडशाही व दडपशाहीला कंटाळलेला असून त्याचा बीमोड करण्याचे आता जनतेने ठरवले आहे. दुसऱ्याला दोष द्यायचा व स्वतः मात्र मनमानी कारभार करायचा ही त्यांची वृत्ती आहे. राहाता मतदार संघात आता क्रांतीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी राहुल गांधींना नावे ठेवू नये अशी टीका मा.महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

उंबरी बाळापूर येथे राहाता विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. भाऊसाहेब वाकचौरे, तेलंगणाच्या मंत्री सिधा अक्का, सरपंच सुवर्णाताई भुसाळ, किसन भुसाळ, एड. रामदास शेजवळ, गणपतराव सांगळे, सुभाष भुसाळ आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले की, राहता तालुक्यात प्रस्थापितांची प्रचंड दहशत असून येथे कोणालाही विरोधी बोलण्याची संधी नाही. ते बोलतील तेच धोरण व सांगतील तेच नियम अशी हुकूमशाही या मतदारसंघात आहे. दुसऱ्याला दोष देणारी ही स्वतः मात्र मनमानी कारभार करतात. ही त्यांची वृत्ती आहे. पैशाच्या व सत्तेच्या जोरावर चाललेली यांची दहशत फारकाळाची राहिली नाही. यावेळी जनतेने परिवर्तनाचा ध्यास घेतला आहे. प्रभावती घोगरे यांच्या रूपाने महाविकास आघाडी व राहता मतदार संघाला योग्य उमेदवार मिळाला आहे. विद्यमान महसूल मंत्र्यांचे वाळू धोरण हे पूर्णतः फसले असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. वाळू माफिया निर्माण व्हावे व यांच्या तिजोऱ्या भराव्या यासाठी यांनी हे धोरण राबवले. विधानसभेत प्रश्न विचारला असता त्यांना याबाबत ठोस उत्तर देता आले नाही. यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलला. स्वार्थासाठी व सत्तेसाठी कोलांट्या उड्या मारणाऱ्यांनी राहुल गांधींना नावे ठेवू नये. यांना सत्तेची भूक असून सत्तेतून पैसा व पैशातून दहशत निर्माण करण्याची यांची पूर्वीपासून पद्धत आहे.

यावेळी मात्र मतदारसंघातील जनता हे सर्व मोडीत काढणार आहे. यांना आता पराभवाच्या भीतीने घाम फुटला आहे. दुग्धविकास मंत्री पद असतानाही दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे यांनी जाहीर केले मात्र अद्यापही अनुदान दिले नाही. यांच्या मतदारसंघातील सर्वच संस्था मोडकळीस आल्या आहे. नगर शिर्डी कोपरगाव या रस्त्याचे काम यांना करता आले नाही. गणेश कारखाना यांच्या दहशतीला पूर्णपणे कंटाळला होता म्हणूनच आपल्या हातात त्यांनी कारभार दिला. संगमनेर तालुक्यासारखी अर्थव्यवस्था, समृद्धी व राजकारण आणायचे असेल तर आता या मतदारसंघातही दुरुस्ती करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीत मंत्रिपद असताना या मतदारसंघात कामांना मंजुरी व निधी दिला पण त्याचा कधी गवगवा केला नाही. हे मात्र कोतवाला पर्यंत फोन करतात हे हास्यास्पद आहे. यांना बहीण लाडकी नसून सत्ता लाडकी आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी पराभवाच्या भीतीने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. पराभवाच्या भीतीने आता यांनी माझ्या व प्रभावती ताई घोगरे यांच्यावर भाषण बंदी आणण्याचा प्रयत्न केला असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी खा.वाकचौरे म्हणाले की, राज्यात व मतदारसंघात आता परिवर्तन अटळ आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भक्कम मताधिक्य द्यावे. मतदान हा राज्यघटनेने व लोकशाहीने आपल्याला दिलेला पवित्र हक्क असून त्याचा विचारपूर्वक अवलंब करावा. व आगामी निवडणुकीत या भागाच्या विकासासाठी सर्वसामान्य व प्रामाणिक उमेदवार प्रभावती घोगरे यांना विजयी करावे.

प्रभावती घोगरे म्हणाल्या की, राज्यात सध्या जातीच्या व धर्माच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. विविध प्रलोभने दाखवून मतदान करून घेणे हे राज्यघटना विरोधी आहे. साम –दाम – दंड – भेद यांसारखी अनेक प्रकारच्या घटना घडतील त्याला मतदारसंघातील लोकांनी बळी पडू नये. राहता मतदार संघात अनेक प्रश्न प्रलंबित आहे. जनतेला सतत झुलवत ठेवायचे हा त्यांचा दुष्ट हेतू आहे. तो आपण मोडीत काढणार आहोत. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा आपला संघर्ष असून अभिमान वाटेल असे काम मतदारसंघात करून दाखवील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
