शिर्डी । झुंजार न्यूज
आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी या संस्थान व साईभक्तांचा महत्त्वाचा दुवा असणाऱ्या जनसंपर्क कार्यालयात सद्यस्थितीत घडणाऱ्या घडामोडी पहाता बोगस पास तयार करणाऱ्या एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे या कार्यालयात नेमके चालले तरी काय असा प्रश्न सर्व सामान्य साईभक्तांना पडला आहे.
एका साईभक्त साधू कडून जनसंपर्क कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला सुमारे चौदा लाख रूपये दिल्याचा आरोप सध्या समाज माध्यमावर फिरत आहे तर दुसरे प्रकरणात सागर रमेश आव्हाड या कर्मचाऱ्याने संगणकावर बनावट दर्शन पास विक्री करून साईभक्तांना व्हिआयपी गेट ने सोडत असताना निदर्शनास आल्याने गुन्हा दाखल झाल्याने जनसंपर्क कार्यालय संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे.

देशविदेशातून साईंच्या दर्शनाला साईभक्तांचा ओघ सुरूच आहे. त्यांना दर्शन सुखकर व्हावे म्हणून साई संस्थान अनेक उपाययोजना राबवत आहे. त्यासाठी अद्ययावत अशी दर्शन रांग तयार करण्यात आले आहे. संस्थाने यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला असून अगदी चोख यंत्रणा राबवली जात आहे. मात्र व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था करणेकाणी जनसंपर्क कार्यालय अहोरात्र भक्तांची सेवा करण्यात तत्पर आहे. जनसंपर्क कार्यालयाची प्रतिमा उंचावण्यामधे माजी जनसंपर्क अधिकारी स्व. मोहन यादव यांचे मोठे योगदान दिले होते. त्यामुळे त्यांचे कारकीर्दीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सत्यस्थितीला जनसंपर्क अधिकारी म्हणून शिर्डीचे भूमीपूत्र तुषार शेळके हा उमदा तरूण अधिकारी आपली जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडीत असताना काही लोक साईबाबांनाही फसवून पेसे कमावण्याच्या लोभापाई संस्थानला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहे. यात काही संस्थानचे कर्मचारी गुंतले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा प्रकार संस्थानचे इतिहासत काही नवीन नाही अशी फसवेगिरी अनेक वेळा उघड झालेली आहे. अशा प्रकरणात अनेकांचे हितसंबंध असल्याने एकतर हे प्रकरण दाबले जाते किंवा ग्रामस्थांनी अशी प्रकरणे उचलून धरल्यास प्रसंगी कारवाई केली जाते. या ठिकाणी परमानंट, अनुभवी व जबाबदार कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे असताना कंत्राटी कर्मचाऱ्याची नेमणूक करून संस्थान ला नेमके काय साध्य करायचे हे न उलगडणारे कोडे आहे. बनावट पास प्रकरणी अडकलेला सागर आव्हाड याचे प्रथमदर्शनी निलंबित करण्याची जुजबी कारवाई म्हणजे या प्रकरणात त्याला कोण कोण वाचवत होते. त्याचे अजून कुणाशी हितसंबंध आहे याची सखोल चौकशी झाल्यास मोठे मासे हाताशी लागले तर त्यांना ही सहआरोपी करण्यास संस्थान प्रशासन कठोर भूमिका घेईल का? हे अनुत्तरित आहे. संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलावळे हे अनुभवी प्रशासकीय अधिकारी आहेत.

या कार्यालयात पुन्हा असे प्रकार घडूच नये यासाठी विभागांचे सर्च ऑपरेशन करणे गरजेचे असून याची पाळेमुळे नष्ट केल्यास संस्थानची बदनामी थांबेल. दरम्यान संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांनी बेटर कम्युनिकेशन्स मुंबई चा कंत्राटी डीटीपी ऑपरेटर आरोपी सागर रमेश आव्हाड याचे विरूद्ध भारतीय न्याय संहिता २०२३नुसार ३१८ (४),३३५,३३६ (२), ३४० (२)२३८ प्रमाणे शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

