संगमनेर । झुंजार न्यूज
अनोळखी चोरट्याने हॉटेल फोडून रोख १५ हजार रुपये आणि पाऊण लाखाची दारू लंपास केल्याची घटना नासिक-पुणे मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी घडली. गुन्हेगारांवरील नियंत्रण सुटलेल्या संगमनेर पोलिसांना हॉटेल फोडत गुन्हेगारांनी नवे आव्हान दिले आहे. या प्रकरणी संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात हॉटेल व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध ७१ हजार ६६० रुपयांची विविध कंपनीची दारू चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेल्या अरगडे गल्लीतील डिडडी यांच्या मालकीचे हॉटेल वाईन स्पॉट हॉटेल बुधवारी ( दि. २५) रात्री नेहमीप्रमाणे बंद करून हॉटेलचे व्यवस्थापक घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी हॉटेल उघडण्यासाठी आले असता हॉटेलचे शटर उचकटलेले दिसले.

व्यवस्थापक आणि वेटर यांनी हॉटेलमध्ये जाऊन पाहणी केली असता हॉटेलचा गल्ला फोडलेला दिसला व रॅकला लावलेल्या दारूच्या बाटल्या देखील आढळून आल्या नाही. अज्ञात चोरट्याने चोरून नेलेल्या दारू मध्ये विविध कंपनीच्या दारूसह सीसीटीव्ही व पंधरा हजार रुपयांच्या रोकड रकमेचा समावेश आहे.

शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध दारूच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार अशोक पारधी करत आहे.
Post Views: 702

