संगमनेर । झुंजार न्यूज
सनातन धर्म म्हणजे एक परिवार आहे. वसुधैव कुटूंबकम् असा संदेश सनातन संस्कृतीने सर्व जगाला दिला.मात्र परकीय शक्तीच्या जोरावर या सनातन धर्माला संपविण्याची भाषा कोणी करीत असेल तर, ते आम्ही कदापीही सहन करणार नाही. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले संविधान आम्ही मानतो. मात्र या संविधानात कॉग्रेसने केलेली गडबड ही समाजाला विभागणारी आहे. त्यामुळेच डॉ.आंबेडकरांच्या मूळ संविधानानेच देश चालला पाहीजे असे परखड मत आयोध्याधाम येथील श्री.जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी व्यक्त केले.
हिवरगाव पावसा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री.जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी सनातन हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक होत असलेल्या टिकेवर तसेच या संस्कृती केल्या जाणाऱ्या टिकेवर परखड मत व्यक्त करताना सांगितले की, कोणीतरी एखाद्या मंत्र्याचा मुलगा उठतो आणि हिंदु धर्माला संपविण्याची भाषा करतो हे कदापीही आम्हाला सहन होणारे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आज विचारांच्या आधारावर करीत असलेल्या प्रगतीचा गौरव करुन आचार्य म्हणाले की, हा सनातन धर्म म्हणजे एक पृथ्वी एक परीवार आहे. वसुधैव कुटूंबकम् असा संदेश संपूर्ण विश्वाला देशाने दिला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
धर्मविर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा उल्लेख करुन, धर्मासाठी बलिदान देणा-या संभाजी महाराजांची हत्या करणा-या औरंगजेबाचा आदर्श मानणारे काहीजण आजही आहेत. उघडपणे त्याचे समर्थन केले जाते, ज्यांनी स्वत:च्या तीन भावांची हत्या केली त्या औरंगजेबाची कबर राहाता कामा नये. महाराष्ट्र सरकारने याबाबत वेळीच भूमिका घ्यावी असे आवाहनही आचार्यानी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पुर्ण करायचे असेल तर, त्याची सुरुवात स्वत:च्या परिवारा पासून करावी लागेल. संस्कार, स्वास्थ्य आणि शिक्षण याला प्राधान्य देवून आमचा विद्यार्थी घडला पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच बांगलादेशातून आलेले घुसखोर आज या देशाला विभक्त बनवू पाहत आहेत. यासाठी परकीय शक्तीही मोठ्या ताकदीने मदत करीत आहेत. यातूनच युवा पिढीला व्यसनाधीनतेकडे नेले जात आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा राम राज्याचा जागर झाला पाहीजे. आई वडीलांना सांभाळणे हे खरे रामराज्य आहे. आई वडीलांची उपेक्षा करणा-या परंपरेत कधीही रामराज्य निर्माण होणार नाही असे त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
