संगमनेर । झुंजार न्यूज
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि. ९) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.

जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या धोरात साखर कारखाना निवडणुकीत शेवटच्या दिवशी (दि ९) विरोधक व सत्ताधाऱ्यात अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होईल अशी उत्सुकता होती. मात्र विरोधकांनी या निवडणुकीतून बिनशर्त माघार घेतल्याने आता निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रांताधिकारी कार्यालयाकडे विरोधक फिरकलेच नाही. आमदार अमोल खताळ यांनी या निवडणुकीकडे पाठ फिरविल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसारच अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता मावळली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी एकूण १३३ जणांनी अर्ज दाखल केले. यात साकूर गटात १९, जोर्वे गट- २६ अर्ज, तळेगावगट- १२ अर्ज, धांदरफळ गट-१८ अर्ज, अकोले जवळे गट २३ अर्ज, संघ सहकारी संस्था गट ३ अर्ज, अनुसूचित जाती जमाती ४ अर्ज, महिला गट ७अर्ज, इतर मागास प्रवर्ग गट १२ अर्ज, भटक्या विमुक्त जाती-जमाती गट ९ अर्ज दाखल करण्यात आले. यात काही गटात ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी सकाळपासूनच प्रांताधिकारी कार्यालयात निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी हजेरी लावली. प्रांताधिकारी कार्यालयात दोन्ही गटांचे कार्यकर्ते दिवसभर ठाण मांडून होते. हे सर्व जण क्षणाक्षणाची माहिती आपापल्या नेत्यांना पुरवत होते. विरोधकांवर नजर ठेवली जात होती.

थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी विरोधकांनी तयारी केली होती. मात्र वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्याने तालुक्यातील विरोधकांनी बुधवारी तीनच्या सुमारास निवडणुकीतून माघार घेत असल्याचे पत्रक काढले.

पत्र प्रसिद्ध होताच विरोधकांतील इच्छुक हतबल झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी साखर कारखाना निवडणुकीत राजकीय खेळी यशस्वी करून दाखवली, अशी चर्चा सुरू झाली होती.
