पुणे । झुंजार न्यूज

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळेगाव, पुणे येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्जित आणि समाजसेवेच्या मूल्यांना समर्पित ‘पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालया’चे उदघाटन केले.

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, या परिसरातील सामान्य नागरिक, कामगार, औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि किफायतशीर आरोग्यसेवा पुरवणारे हे रुग्णालय खऱ्या अर्थाने एक वरदान ठरणार आहे.

 

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी 2014 मधील एक भावनिक आठवण सांगितली. “सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना तिथे अनेक लहान मुले व त्यांच्या आई-वडीलांनी ‘धन्यवाद मुख्यमंत्री काका’ असे बॅनर घेत आमची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता, तुमच्यामुळे आमच्या मुलांची हृदय शस्त्रक्रिया पार पडल्याचे त्यांनी अश्रूपूर्ण डोळ्यांनी सांगितले”, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी याचे श्रेय डॉ. विजय पाटील यांना दिले.

 

 

 

तेव्हापासून डॉ. विजय पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत 70 खाटा कायमस्वरूपी गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवल्या आहेत. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीने शिफारस केलेल्या किमान 12 ते 15,000 रुग्णांवर येथे उपचार करण्यात आले आहेत. गरिबांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच आमच्या कार्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे, तो या माध्यमातून त्यांना आणि आम्हालाही मिळाला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

 

 

खरे मोठेपण इमारतींच्या उंचीत नव्हे, तर त्या इमारतीतून सामान्य माणसासाठी काय दिले जाते यावर ठरत असते. डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिलेले संस्कार आणि मूल्यांद्वारे हे मोठेपण आज डॉ. विजय पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या कार्यातून प्रकट होत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

 

 

राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ आणि केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’अंतर्गत प्रत्येकी ₹5,00,000 पर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. या योजनांमुळे गरजू नागरिकांना इन्शुरन्स आणि ॲशुरन्स दोन्ही मिळते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

 

 

राज्यातील आरोग्य व्यवस्थेची पुनर्रचना करण्यात येत आहे. याद्वारे आरोग्य सुविधांचे मोठे जाळे निर्माण करून प्राथमिक आरोग्य सुविधेला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे विशेषोपचार असलेल्या संदर्भ सेवांवरील ताण कमी होतो. तसेच द्वितीय स्तरीय आरोग्य सेवाही बळकट करण्यात येणार आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा आमचा संकल्प आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची निर्मिती होणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

 

मुलींसाठी 100% आणि मुलांसाठी 50% शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठा विस्तार व गुणवत्ता दिसून येत आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाने अशा समाजोपयोगी उपक्रमांत सातत्य ठेवावे. त्यांना शासनाचे सर्व सहकार्य मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

 

यावेळी खा. श्रीरंग बारणे, आ. सुनील शेळके व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *