◻️जखमी झालेल्या २१ मेंढ्यापैकी ११ मेंढ्याचा मृत्यू

 

 

◻️एक मादी बिबट्यासह तिच्या दोन पिल्लाचा राजरोस वावर कायम

 

आश्‍वी | झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याने हल्ला करुन २१ मेंढ्या जखमी केल्या होत्या. यावेळी ५ मेंढ्यासह १५ ते २० कोंबड्यांचा देखील मृत्यू झाला होता. त्यानंतर तात्काळ वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. तर, मागील तीन दिवसांत जखमी झालेल्या २१ मेंढ्यापैकी ११ मेंढ्याचा मृत्यू झाल्यामुळे शेतकऱ्यांचे तीन ते साडेतीन लाखांचे अर्थिक नुकसान झाले आहे.

 

 

उंबरी बाळापूर शिवारातील लेंडी पुलाजवळ असलेल्या दत्तनगर येथे खंडू कारभारी होडगर यांच्या गट नबंर ४७६ मधील गोठ्यात असलेल्या मेंढ्या आणि कोंबड्यांवर शुक्रवारी पहाटे हल्ला करुन धुडगूस घातला होता. यामध्ये ४ ते ५ मेंढ्यासह १५ ते २० गावरान कोंबड्यांचा देखील मृत्यू झाला होता.

 

 

 

त्यामुळे संदीप होडगर, सुरेश होडगर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे पाठपुरावा करुन पिंजरा लावुन दहशत निर्माण करणारा बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली होती. त्यामुळे वनविभागाने तात्काळ याठिकाणी भक्ष्य ठेवून याठिकाणी पिंजरा लावला होता. शनिवारी सायंकाळी ८.३० वाजेच्या सुमारास बिबट्या अलगद या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे त्यानें जोर – जोरात ओरडण्यास सुरवात केली. त्यामुळे संदीपने बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी या बिबट्याला संगमनेर येथील रोपवाटिकेत घेऊन गेले आहेत. हल्ला करणारा बिबट्या हाचं होता का? याबाबत मात्र, अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही.

 

 

 

तर, या तीन दिवसांच्या कालावधीत जखमी झालेल्या २१ मेंढ्यापैकी लहान – मोठ्या अशा एकूण ११ मेंढ्याचा मृत्यू झाला असून तीन ते चार मेंढ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पशुपालन संदीप होडगर यांने दिली. तसेच अंदाजे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान संदीपने कर्ज काढून या मेंढ्या घेतल्यामुळे त्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर त्याला जास्तीत जास्त भरपाई द्यावी. अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यानी केली आहे.

 

 

 

परिसरात मागील अनेक दिवसांपासून बिबट्याची मोठी दहशत आहे. हा एक बिबट्या पिंजऱ्यात अडकल्या असला तरी, एक मादी बिबट्या व तिची दोन पिल्ले राजरोसपणे या परिसरात नजरेस पडत असतात. त्यामुळे वनविभागाने त्याना देखील जेरबंद करुन शेतकऱ्यांची दहशतीतून मुक्तता करावी. त्याचबरोबर या तरुणाला मदत मिळवून देण्यासाठी स्थानिक पदाधिकारी यांनी देखील प्रयत्न करावेत.

 

सुरेश होडगर, स्थानिक शेतकरी

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *