अहिल्यानगर । झुंजार न्यूज

अहिल्यानगर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.हा सोहळा २७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता मार्केट यार्डजवळील चौकात होणार असून, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप असणार आहेत.

 

 

 

 

पुतळ्याची वैशिष्ट्ये आणि परिसर विकास
हा पुतळा ब्रॉन्झ धातूचा असून त्याची उंची साडेदहा फूट आहे. तो साडेअकरा फुटांच्या चौथऱ्यावर उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ८५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून, पुतळ्याच्या सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे.हा पुतळा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.
याच कार्यक्रमादरम्यान, मार्केट यार्ड चौकाचे नाव “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक” असे ठेवण्यात येणार आहे, अशी घोषणा महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केली आहे.
विविध मान्यवरांची उपस्थिती आणि सांस्कृतिक कार्यक्रम
या अनावरण सोहळ्याला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार निलेश लंके, आणि आंबेडकरी चळवळीतील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी महानगरपालिकेकडून जय्यत सुरू असून, नागरिकांच्या सोयीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

 

 

 

यानिमित्ताने प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप आणि आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.

 

 

 

 

 

यापूर्वी या ठिकाणी असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा सन्मानाने आणि विधिवत पूजा करून काढण्यात आला असून, तो महानगरपालिकेच्या आवारात बसवण्यात येणार आहे. ६३ वर्षे जुना असलेला हा अर्धाकृती पुतळा १० नोव्हेंबर १९६१ रोजी तत्कालीन समाज कल्याणमंत्री दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते बसवण्यात आला होता. 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *