शिबलापूर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील शासकीय वाळू डेपोतून घरकुल योजनेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याचा गंभीर आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोंडे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. सलग सहा दिवस चाललेल्या या उपोषणानंतर अखेर प्रशासनाने नमते घेत मुन्तोंडे यांच्या सर्व प्रमुख मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या, त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.

 

Oplus_131072

 

 

काही दिवसांपूर्वी शिबलापूर येथे शासनाने वाळू डेपो सुरू केला होता. मात्र, या डेपोतून एकाच पावतीवर अनेक डंपर वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची तक्रार संजय मुन्तोंडे यांनी केली होती. या गैरप्रकाराकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्कल आणि तलाठी यांनी मुन्तोंडे यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका मुन्तोंडे यांनी घेतली होती.

 

 

Oplus_131072

 

उपोषणाच्या प्रमुख पाच मागण्या पुढीलप्रमाणे होत्या:
शिबलापूर येथील नदीपात्रातील वाळूचोरी रोखण्यासाठी २४ तास गस्त घालणारे पथक नेमावे.
शिबलापूर डेपोवरील वाळू प्रथम शिबलापूर येथील नोंदणीकृत लाभार्थ्यांना प्राधान्याने देण्यात यावी.
डेपोचालक आणि ठेकेदार यांची सखोल चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करावा.
चौकशी अहवालात डेपोचालक व ठेकेदार दोषी आढळल्यास वाळू डेपो कायमस्वरूपी बंद करावा.
गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

 

 

Oplus_131072

 

उपोषणाचे पाच दिवस उलटूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने उपोषणकर्ते आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. सहाव्या दिवशी संजय मुन्तोंडे यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अखेरीस, प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या सूचनेवरून मंडलाधिकारी अनिल आव्हाड आणि तलाठी अंकित मंडलिक यांनी उपोषणस्थळी धाव घेत मुन्तोंडे यांच्या पाचही मागण्या लेखी पत्राद्वारे मान्य केल्या. यानंतर आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे आणि मंडलाधिकारी अनिल आव्हाड यांच्या हस्ते ज्यूस देऊन मुन्तोंडे यांचे उपोषण सोडवण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

Oplus_131072
उपोषणस्थळी मोठा जनसमुदाय; खासदारांचाही पाठिंबा

 

 

या उपोषणाला मोठा जनाधार मिळाला होता. खासदार निलेश लंके यांनीही फोनवरून संपर्क साधत उपोषणाला पाठिंबा दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना केली. उपोषणस्थळी सुमारे २५०-३०० महिला आणि मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते, ज्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला होता. उपनिरीक्षक बर्डे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता, तर शिबलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. जोंधळे आणि त्यांचे सहकारी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *