जामखेड । झुंजार न्यूज
जामखेड तालुक्यातील नान्नज गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गुंडाकडून साळवे कुटुंबावर गज, काठ्या, तलवार व कोयत्यांनी सशस्त्र हल्ला करत मोठा धुमाकूळ घातला. या खळबळजनक घटनेत सात जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला १४ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे व अँट्रासिटीसह विविध कलमान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने जामखेड तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी घडली असून जखमीवर पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे .
या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी तीव्र शब्दात निषेध करत आरोपीना त्वरीत अटक करण्याचे पोलिस प्रशासना आदेश दिले . तर बुधवारी रुग्णालयात जावून जखमीची व्यक्तींना भेट देणार आहे .

गावातील ‘आमची दहशत संपविण्याची भाषा करता, त्यापेक्षा आम्हीच तुम्हाला संपवतो’ असे आव्हान देत आरोपींनी फिर्यादी अभिजीत संपत साळवे व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला चढवला. फिर्यादीच्या भावाला मारहाण झाल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना आरोपींनी फिर्यादीची गाडी अडवून हत्यारांसह राडा घातला. गाडीच्या काचा फोडून, तलवार व कोयत्याने हल्ला करून रोख रक्कम व मोबाईल लुटले. टोळक्याच्या धुमाकूळामुळे नान्नज परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

वैभव विजय साबळे, सार्थक विजय साबळे, अभय कृष्णाराजे भोसले, ओम चंद्रकांत गोरे, विजय शंकर साबळे, साईनाथ शंकर रजपूत, नरेंद्र शहाजी सोनवणे,कल्याण पांडुरंग मोहळकर, सोमनाथ काशिनाथ शिंगटे,( सर्व रा नान्नज ता. जामखेड) , निलेश ज्ञानदेव माने, किरण रावसाहेब जगदाळे, (दोघे रा. महारूळी ता. जामखेड, ) , हर्षद प्रताप काकडे रा. बोर्ले ता.जामखेड व इतर दोन अश्या एकुण १४ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे.

या हल्ल्या प्रकरणात फिर्यादी अभिजीत संपत साळवे, यशदिप संपत साळवे, आदर्श सुनील साळवे, दिग्विजय आबू सोनवणे, सद्दाम लतीफ पठाण, रतन साळवे , रेषमा साळवे हे सात जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे .

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवार दि.२४ ऑगस्ट रोजी फिर्यादी अभिजित संपत साळवे हा घरी असताना त्यास त्याचा भाऊ यशदिप संपत साळवे याने फोन करून सांगितले की, नान्नज बाजार तळावर आरोपींनी भावास मारहाण करून जखमी केले आहे. हे समजताच फिर्यादी हा आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी आला. यावेळी जखमी भावास उपचारासाठी जामखेड येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. परंतू जखमी यशदिप साळवे याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नगर येथे घेऊन जायचे होते. त्यामुळे फिर्यादी हा आपल्या नातेवाईकांना घेऊन सद्दाम लतीफ पठाण यांच्या चारचाकी गाडीने जामखेडला जात असताना जखमी यशदिप साळवे यास मारहाण करणाऱ्या टोळक्याने फिर्यादीची गाडी अडवली आणि फिर्यादीच्या कुटुंबावर गज , काठया , तलवार , कोयते आदी सशस्त्र हल्ला चढवत मोठा राडा घालत गाडीच्या काचा फोडल्या तसेच गाडीतील नातेवाईकांना मारहाण केली. हा हल्ला करत असताना आरोपी वैभव साबळे फिर्यादीला म्हणाला की, तुम्ही काय आमची दहशत संपवता, तुम्ही गाव बंद करून, भाषणे करून आमची दहशत संपविण्याची भाषा करता, त्यापेक्षा आम्हीच तुम्हाला मारून टाकतो, असे म्हणत आरोपींनी फिर्यादीवर तलवार व कोयत्याने जोरदार हल्ल चढवत गंभीर जखमी केले.

या घटनेत आरोपींनी 27 हजार रुपये रोख मोबाईल व गाडीची चावी घेऊन पोबारा केला. यावेळी आरोपींनी लोखंडी गज, काठ्या, तलवार, कोयते हवेत फिरवत आमच्या नादी लागलात तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत मोठयाने आरडा ओरडता करत सर्वजण मोटार सायकलवरून पसार झाले.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी भेट दिली. वरील घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे हे तपास करत आहेत. पोलीसांची तीन पथके आरोपींचा शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताचं रिपाई राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , श्रीकांत भालेराव यांनी पुणे येथील रुग्णालयात जावून जख्मीची भेट घेत घडलेली घटना दहशतीची असून लोकशाही प्रधान देशात स्वतंत्रपणे राहणे मुश्किल झाल्याचे दिसत असून या प्रकरणाबाबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावतीने पोलिस अधिक्षकांना साळवे कुटुबियांना तातडीने पोलिस संरक्षण दयावे अशी विनंती रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी केली आहे .
या घटनेतील खरा मास्टर माईड शोधून काढा असे आवाहन विजयराव वाकचौरे यांनी केले .
