झरेकाठी । झुंजार न्यूज

 

 

माणसाने कधीही हवेत जाऊ नये. कारण हवेत गेल्यावर जमीन दिसायची बंद होते आणि जमिनीवरच मतदार असतात असे सांगून तुम्ही हवेतच राहिले आणि खाली लोकांनी कार्यक्रम लावून टाकला असा टोला माजी खा.डॉ.विखे पाटील यांनी थोरात यांचा नामोल्लेख टाळून लगावतांना, ज्यांना काहीही राजकीय अस्तित्व नाही असा माणूस आपण गोरगरीब व सामान्य माणसाच्या ताकदीवर संगमनेरचा आमदार करून दाखवला ही गोरगरीब जनतेची ताकद आहे. आपण ४० वर्ष जमिनीवर होतो आणि पुढचे चाळीस वर्षे देखील तुमच्या आशीर्वादाने जमिनीवरच राहणार असल्याचे प्रतिपादन माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे जनसेवा युवा मंचच्या फलकाचे अनावरण माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मच्छिंद्र वाणी होते. यावेळी थोरात गटाच्या मंगेश व्यवहारे, जालिंदर वाणी, रोहित व्यवहारे, रवींद्र वाणी यांनी भाजपात प्रवेश केला.

डॉ.सुजय विखे पाटील पुढे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी प्रत्येक माणूस म्हणत होता, विखे परिवार संपवायचा, आता ही यांची शेवटची निवडणूक, यापुढे विखे पाटलांची निवडणूक होऊ शकत नाही आणि आता? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले आश्वासन देण्याचा काळ गेला. आश्वासन देणारे लोक संपले. कोणी हा विचार केला होता की, अमोल खताळ आमदार होऊ शकतात. सामान्य माणसाच्या ताकदीवर ज्याला काहीही राजकीय अस्तित्व नाही असा माणूस आपण आमदार करून दाखवला ही गोरगरीब जनतेची ताकद आहे.

नव्याने संघटन बांधत असताना जुन्यां लोकांनी केलेल्या कामाचा आणि त्यागाचा विसर पडता कामा नये. वसंत देशमुख यांनी धांदरफळ मध्ये केलेले वक्तव्य, त्या वक्तव्यानंतर झालेली दंगल आणि त्या दंगलीनंतर झालेला प्रचार या प्रचारानंतर देखील संगमनेर तालुक्याच्या जनतेने सुजय विखेलाच आमदार करायचे असा निर्णय घेतला होता. पण आपण त्या कालावधीत परिस्थितीचा पूर्णपणे आढावा घेऊन सुजय विखे आमदार झाला नाही तरी चालेल पण आपण आपल्या छोट्या भावाला अमोल खताळला आमदार करू शकलो हा मनाचा मोठेपणा प्रत्येकाने दाखवला पाहिजे. मला पदाची अपेक्षा नाही, एखाद्या मंत्र्याने, आमदाराने, खासदाराने एवढ्या रात्री एवढी सभा घेऊन दाखवावी, असे सांगून ते म्हणाले एवढी गर्दी एका माजी खासदाराच्या सभेला होते, काय करता पदाला? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले पद एक निमित्त असतं पद गेल्यानंतर माणसाची किंमत जर टिकून राहिली तर समजून घ्यायचं तो माणूस त्या पदापेक्षा मोठा आहे आणि हे आपण करून दाखवल आहे.
खासदारकी गेली आपण खचलो नाही. ताकतीने उभे राहिलो, गावागावात जाऊन लोकांशी संपर्क साधला संगमनेर तालुक्यातील जनतेने ४० वर्ष विखे परिवारावर प्रेम केले आहे. नगर दक्षिण मध्ये लाटेमध्ये कोणीतरी खासदार होऊन गेलं. आज कोण विचारत असा टोला खा. निलेश लंके यांचे नाव न घेता डॉ. सुजय विखे यांनी लगावतांनाच आज नगर दक्षिणची काय परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही संसद बंद पाडू बोलणाऱ्यांना संसदेत दोन मिनिटे बोलू दिले जात नाही अशी अवस्था या खासदाराची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ज्यांनी युवा मंच स्थापन करण्याची संकल्पना मांडली व ती यशस्वी करून दाखवली असे भाजपा बूथ प्रमुख सोमनाथ डोळे, गंगाधर व्यवहारे, डॉ.रमेश वाणी,प्रा.वनिता नाईकवाडी, स्वप्निल पाटील, राहुरीचे माजी सभापती भीमराज हारदे, पद्मश्री कारखान्याचे संचालक विजय म्हसे, सरपंच सतीश जोशी, भारत गीते, प्रा. कान्हु गीते, शरद ढमक, माजी सरपंच अशोक जोशी,जनसेवा युवा मंचचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन सचिन आव्हाड यांनी केले.

 

 

ज्या मराठा आरक्षणामुळे लोकसभेमध्ये पूर्ण राजकारण झालं आणि त्याचा फटका मला बसला, आज त्याच मराठा आरक्षणाची सोडवणूक करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर दिली. विखे पाटलांना या समितीचे अध्यक्ष केलं.कोणी जायला तयार नव्हतं, ज्या ठिकाणी जायला पुढारी घाबरत होते तेथे विखे पाटील मोकळ्या मनाने गेले, मराठ्यांना आधार दिला.

 

 

 

त्यावेळी संगमनेरचे काही लोक खुश झाले की, आता हे कसे फसतील. अनेक लोक देव पाण्यात ठेवून बसले होते, कसं का होईना हे विखे पाटलांच्या हातून घडता कामा नये. कसे विखे पाटील यात अडकतील मात्र परमेश्वराची पुण्याई, परमेश्वराच्या प्रति आपली भक्ती, गरिबांचा आशीर्वाद आणि ४० वर्षाच्या कौटुंबिक त्यागाचा परिणाम होता. त्यामुळे उपोषण सोडवतांनी जरांगे पाटील यांनीही उपोषणाचे श्रेय मुख्यमंत्र्यांचे तर आहेच पण मुख्यमंत्र्यानंतर विखे पाटलांना याचे श्रेय जाते असे सांगितले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *