संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील शेतकरी वेणुनाथ शंकर पाबळ यांना सिजेंटा कंपनीच्या ‘सिंबा’ जातीच्या टरबूज बियाण्यांमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. अपेक्षेप्रमाणे उत्पादन न मिळाल्याने त्यांचे सुमारे तीन लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनी कृषी विभाग आणि कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
वेणुनाथ पाबळ यांनी आश्वी शेतकरी कृषी केंद्रातून १६ हजार रुपये खर्च करून ‘सिंबा’ जातीच्या टरबूज बियाण्यांच्या १० पुड्या खरेदी केल्या होत्या. जुलै महिन्यात त्यांनी या बियाण्यांची लागवड केली. लागवडीनंतर दोन महिने उलटूनही टरबूजाचे वेल वाढले खरे, परंतु फळे मात्र तुरळक प्रमाणात लागली. जी काही फळे आली, ती केवळ लहान-मोठ्या आकाराची आणि सरासरी २ किलो वजनाची होती. शेतकऱ्यांची अपेक्षा होती की सव्वा दोन महिन्यांत टरबूजाचे वजन किमान ४ ते ५ किलोपर्यंत वाढेल, परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही.
या टरबूज लागवडीसाठी पाबळ यांनी मोठा खर्च केला होता. यामध्ये दोन कॅमेरे, रानडुक्करांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वाघूर, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन प्रणाली, औषध फवारणी आणि खते यावर एकूण ८० हजार रुपये खर्च झाले होते. बियाण्यांचा खर्च आणि इतर सर्व खर्च पाहता पाबळ यांचे अंदाजे तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे बियाणे कंपन्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी कृषी केंद्रासह सिजेंटा कंपनीकडे तक्रार केली. तक्रारीनंतर ८ ते १० दिवसांनी कंपनीचे प्रतिनिधी पाहणी करण्यासाठी आले, मात्र त्यांनी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. त्यानंतर पाबळ यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला, परंतु १०-१२ दिवस उलटूनही त्यांनी पाहणी केली नाही.
या सर्व प्रकारामुळे वेणुनाथ पाबळ हवालदिल झाले असून, त्यांनी आपल्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्या नुकसानीची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांनी बियाण्यांची निवड करताना अधिक खबरदारी घेण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे .