राहाता–पानोडी (संगमनेर) हा ३६ किमी लांबीचा काँक्रीट महामार्ग तब्बल १५६ कोटींच्या खर्चातून उभारला जात आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ, मुंबई यांच्या मार्फत हे काम सुरू असून मोठ्या यंत्रसामग्रीसह गुणवत्तापूर्ण व जलद गतीने रस्ता उभा राहत आहे. लोहारे ते आश्वी बु॥ शासकीय विश्रामगृहापर्यंत रुंदीकरण खोलीकरण करत एका दिशेने आधी काँक्रीट व त्यावर स्टिल टाकुन दुसरा थर टाकून पूर्ण झाला आहे. कामाचा वेग व गुणवत्ता पाहता हा रस्ता अत्यंत जलदगतीने उभा राहत असल्याचे कौतुक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
मात्र याच वेळी आश्वी बु॥ शासकीय विश्रामगृह ते आश्वी खुर्द प्रवरा उजवा कालवा या अवघ्या दोन किलोमीटरच्या रस्त्याने नागरिकांचं आयुष्य धोक्यात आणलं आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे की रस्ता आहे की खड्डा हेच समजेनासं झालंय. रोज विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. वाहतुकीचा प्रचंड ताण आणि खड्ड्यांमुळे अपघात ही रोजचीच बाब झाली आहे.
प्रवरा नदीवरील पूल तर अपघातांचं केंद्र ठरत आहे. डांबर उखडलं असून मोठमोठे खड्डे झाले आहेत. खड्यांमध्ये पाणी साचलं, दोन्ही बाजूंचे पाईप चोक झाले, पाण्याचा निचरा होत नाही. पुलावर दोन्ही साईडला माती साचली असुन त्यावर गवत उगवलं आहे तर पुलाच्या आश्वी खुर्द व आश्वी बु॥ दोन्ही कडुन कुठलेही दिशादर्शक फलकच नाहीत. त्यामुळे या पुलावरून जाणं म्हणजे अक्षरशः जीवावर उदार होऊन प्रवास करणं झालं आहे.
आश्वी खुर्द गावात शिरताच रस्ता संपतो आणि फक्त खड्ड्यांचं राज्य सुरू होतं. पावसाळ्यात तर गावातून जाणं म्हणजे नरकयात्रा ठरते. हा रस्ता केवळ दोन गावांना जोडत नाही तर १५ ते २० गावातील नागरीक याच रस्त्याने दररोज ये जा करत असुन याच रस्त्याने संगमनेर, लोणी, साकूर या प्रमुख मार्गांला जोडले जातात. या रस्त्यावर आठवडे बाजार, पेट्रोल पंप, शाळा, बँका, दवाखाने, मॉल, शोरूम्स असल्याने याठिकाणी नागरिकांची मोठी रहदारी असते. एवढं महत्त्वाचं ठिकाण असूनही प्रशासनाचं लक्ष या टप्प्याकडे गेलेलं नाही.
नागरिक आता सरळ सवाल विचारत आहेत – दररोज मुलांना शाळेत सायकलने पाठवताना अपघात झालाच तर जबाबदार कोण? एवढा मोठा रस्ता होतोय पण आमच्या दोन किलोमीटरकडे कोणी लक्ष देत नाही.” तरुणांचा प्रश्न अधिक धारदार – “रोज अपघात होतात, कोणीच दखल घेत नाही. मोठा अपघात झाल्यावर तरी सरकार उत्तर देणार का?”
नागरिकांची ठाम मागणी आहे की या दोन किलोमीटरच्या टप्प्यावर तातडीने खड्डे बुजवून सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा. महामार्गाचं कौतुक योग्यच आहे, पण नागरिकांच्या न्याय्य मागण्या दुर्लक्षित करणं धोकादायक ठरेल. शासनाने आणि ठेकेदार व संबंधीत कंपनीने लगेच जबाबदारी स्वीकारून या टप्प्याचं काम पूर्ण करावं, अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.
१५६ कोटींचा महामार्ग उभा राहत असताना दोन किलोमीटरसाठी नागरिकांनी जीव धोक्यात घालायचा का, हा प्रश्न प्रशासनाला सतावतो आहे. सरकार, ठेकेदार आणि संबंधित विभाग आता तरी जागे होणार का, हा खरा सवाल आहे.