आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील २८ गावांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून झालेल्या ९०-१०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून पिके सडली आहेत, तर काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मोहित गायकवाड यांनी तहसीलदार धीरज मांजरे  यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान

गायकवाड यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, आश्वी आणि परिसरातील शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसायात मोठा सहभाग आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या गायी आणि इतर जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पिके वाहून गेल्याने आणि शेतात पाणी साचल्याने पिके व चारा सडून गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

 

 

दिवाळी तोंडावर असताना मोठे संकट

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेती आणि दुग्धव्यवसाय दोन्हीचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने कोणतेही निकष न लावता, संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील सर्व महसूल मंडळांतील महसुली अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देऊन त्या गावातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत आणि त्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.

 

 

कर्ज वसुलीला स्थगिती देण्याची मागणी

यासोबतच, राष्ट्रीयीकृत बँका, सर्व पतसंस्था आणि शेड्युल्ड बँकांनी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहे, त्यांना वसुलीसाठी कोणताही तगादा करू नये. शासनाने परिपत्रक जारी करून कर्जदार शेतकऱ्यांना कर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी. तसेच, सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्यानंतर, त्यातून सर्व बँका आणि पतसंस्थांनी कर्ज वसुली करू नये, त्यास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणीही गायकवाड यांनी केली आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *