शिवराज्य निर्माण संघटनेचा अनोखा उपक्रम !

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणारी शिवराज्य निर्माण संघटना यावेळी एका अत्यंत वेगळ्या आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे चर्चेत आली आहे. संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे माजी अध्यक्ष तथा संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर तालुक्यातील तब्बल २९ गावांतील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना हॉलीबॉल किटचे वाटप करण्यात आले.

आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेटच्या आहारी गेलेल्या नवतरुण पिढीला पुन्हा एकदा मैदानी खेळांकडे वळविण्याचा हा उपक्रम ठरला आहे. मोबाईल गेम्स, सोशल मीडिया आणि डिजिटल जगाच्या आहारी गेलेली मुले आता आपले बालपण आणि शरीरसंपदा दोन्ही गमावत आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवराज्य निर्माण संघटनेने रणजितसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त समाजाला देणगी स्वरूपात हा उपक्रम हाती घेतला आहे.”

 

या वाटप कार्यक्रमात संघटनेचे अध्यक्ष तसेच कोअर कमिटीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रत्येक गावात तरुणांसाठी हॉलीबॉल किट पोहोचवले. या किटमध्ये खेळाची संपूर्ण सामग्री—बॉल, नेट, स्टँड आणि इतर आवश्यक साहित्य समाविष्ट आहे. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना पुन्हा खेळाची सवय लागावी, टीम स्पिरिट वाढावे आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजावी, ही संघटनेची भावना आहे.

 

 

संघटनेचे कार्यकर्ते सांगतात, “आज मोबाईलच्या नादात मुलं व्यायाम आणि मैदानी खेळ विसरत आहेत. शरीर निरोगी आणि मन प्रसन्न ठेवण्यासाठी खेळ अनिवार्य आहे. त्यामुळे मुलांनी मोबाईलच्या पडद्याऐवजी मैदानावर घाम गाळावा, हाच आमचा संदेश आहे.” ।

 

 

गावागावांत या उपक्रमाचे स्वागत उत्साहात झाले. अनेक ठिकाणी मुलांनी आनंदाने खेळायला सुरुवातही केली. काही ठिकाणी पालकांनी संघटनेचे कौतुक करत म्हटले की, “हा उपक्रम केवळ खेळाचा नाही तर नव्या पिढीला योग्य दिशेने नेणारा आहे. शिवराज्य निर्माण संघटनेचा हा उपक्रम फक्त खेळापुरता मर्यादित नसून, तरुणाईत सकारात्मक ऊर्जा, संघभावना आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देणारा आहे. या प्रयत्नामुळे नक्कीच संगमनेर तालुक्यातील तरुण पुन्हा एकदा मैदानी खेळांकडे वळतील आणि “आरोग्य हेच खरे संपत्ती” या विचाराची पुनर्रचना होईल.

 

 

 

 

रणजितसिंह देशमुख यांच्या भावना

 

रणजितसिंह देशमुख म्हणाले, “मी माझा वाढदिवस नेहमीच समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण देऊन साजरा करावा, असा माझा प्रयत्न असतो. शिवराज्य निर्माण संघटनेच्या माध्यमातून या वर्षी मुलांना हॉलीबॉल किट वाटपाचा उपक्रम राबवला गेला, हे माझ्यासाठी अतिशय आनंददायी आणि भावनिक क्षण आहेत. आजच्या डिजिटल युगात मुलं मोबाईलच्या पडद्यामागे हरवून चालली आहेत. खेळ, अंगमेहनत, संघभावना या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनातून हळूहळू निघून जात आहेत. पण आज जेव्हा मी मुलांच्या हातात हॉलीबॉल पाहिला, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि खेळाची ओढ पाहिली, तेव्हा मन खरंच भारावून गेलं.”

 

 

ते पुढे म्हणाले, “मी बालपणी स्वतः गावच्या मैदानावर मित्रांसोबत खेळलो, घाम गाळला, हरलो-जिंकलो — त्या खेळातूनच जीवनाचे खरे धडे मिळाले. आज तीच संस्कृती पुन्हा आपल्या मुलांमध्ये जागी होत आहे, यापेक्षा मला वाढदिवसाला मोठं गिफ्ट काहीच असू शकत नाही. माझा वाढदिवस फक्त माझा नसतो — तो समाजाचा, तरुणाईचा आणि आपल्या भविष्यातल्या भारताचा असतो. जर या उपक्रमामुळे एखादं मूल मोबाईल बाजूला ठेवून मैदानावर पाऊल ठेवेल, तर तीच माझ्यासाठी खरी भेट, खरी समाधानाची भावना असेल.”

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *