नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आश्वी आणि परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली असल्याची माहिती युवा नेते मोहित गायकवाड यांनी दिली आहे. तसेच, उर्वरित नुकसान भरपाई देखील लवकरच मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी धीर धरावा, असे आवाहन गायकवाड यांनी आश्वी व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केले.
गत महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील शेती पिकांचे, घरांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीने हिरावून घेतला होता. या कठीण प्रसंगात शेतकऱ्यांना मदतीची नितांत गरज होती. नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या नुकसानीची तात्काळ दखल घेतली. त्यांच्या पुढाकारामुळे प्रशासकीय यंत्रणांनी वेगाने पंचनामे करून अनेक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून दिली. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
या संदर्भात बोलताना मोहित गायकवाड म्हणाले, “विखे-पाटील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळाली आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच नुकसान भरपाई मिळेल याची मी ग्वाही देतो. यासाठी प्रशासनासोबत आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोणावरही अन्याय होणार नाही.
गायकवाड यांनी पुढे सांगितले की, “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पुढील काही दिवसांत उर्वरित मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये आणि सकारात्मक राहावे.” या आवाहनामुळे आश्वी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, उर्वरित मदतीची त्यांना प्रतीक्षा आहे.