कोपरगांव तालुक्यातील घटना; महिला जखमी

 

 

कोपरगाव । झुंझार न्यूज

 

 

घास कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर शुक्रवारी दुपारी बिबट्याने हल्ला केला. प्रसंगावधान राखत मुलाने दाखविलेल्या धाडसाने आईचा जीव वाचला. कोपरगावच्या येसगाव टाकळी शिवारातील कोल्हे वस्ती परिसरात शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

 

साधनाबाई बाबर असे जखमी महिलेचे नाव आहे. साधनाबाई जनावरांसाठी घास आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. अचानक बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. बिबट्याने छातीवर आणि हातावर जखमा केल्या. साधनाबाईंनी आरडा ओरडा केल्यानंतर जवळच असलेल्या मुलाने हातातील विळा घेत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघा मायलेकांनी प्रतिकार करताच बिबट्याने धूम ठोकली. मुलाने बिबट्याच्या दिशेने फेकलेले दगड लागून बिबट्या लगडत पळाल्याचे मुलाने सांगितले.

 

जखमी साधनाबाई बाबर यांना तातडीने कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान वनविभागाने तालुक्यासाठी स्वतंत्र रेस्क्यू टीमची मागणी शासनाकडे केली असून त्याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

 

गेल्या काही महिन्यांपासून टाकळी, येसगाव, शिंगणापूर, चांदगव्हाण, संवत्सर तसेच शहरालगतच्या अंबिका नगर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. महिलांवर आणि लहान मुलांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *